24 तासांत विक्रमी पावसाची नोंद

काणकोणात आठ इंच, तर सांखळी, केपे येथे प्रत्येकी सात इंच, रेड अलर्ट जारी हवामान खात्याचा इशारा पणजी /विशेष प्रतिनिधी राज्याला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले असून पुढील दोन दिवसांकरिता हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे, आणि जनतेला देखील सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने संपूर्ण गोव्यात धुमशान घातले.  काणकोणमध्ये सर्वाधिक सुमारे […]

24 तासांत विक्रमी पावसाची नोंद

काणकोणात आठ इंच, तर सांखळी, केपे येथे प्रत्येकी सात इंच, रेड अलर्ट जारी हवामान खात्याचा इशारा
पणजी /विशेष प्रतिनिधी
राज्याला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले असून पुढील दोन दिवसांकरिता हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे, आणि जनतेला देखील सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने संपूर्ण गोव्यात धुमशान घातले.  काणकोणमध्ये सर्वाधिक सुमारे आठ इंच तर सांखळी व केपेमध्ये प्रत्येकी साडेसात इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, परंतु सुदैवाने कोणतीही मोठी हानी झालेली नाही.
हवामान खात्याने राज्यात मुसळधार पाऊस पडणार, असा शुक्रवारी सकाळी अंदाज व्यक्त केला आणि रात्री उशिरा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात अक्षरश: धुमाकूळ घातला. रात्रभर मुसळधार पाऊस सर्वत्र कोसळला. परिणामी काणकोणमध्ये सुमारे आठ इंच, सांखळीमध्ये साडेसात इंच, केपेमध्ये सात इंच, सांगेमध्ये पाच इंच तर मडगावमध्ये पावणे पाच इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे अनेक भागातील नद्या, नाले तुडुंब भरून पाहू लागले. सांखळीच्या वाळवंटी नदीचा पाण्याचा स्तर सकाळी वाढला होता. मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून सुमारे दोन मीटरनी पाण्याचा प्रवाह वाढला होता, मात्र पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाण्याचा प्रवाह थोडा कमी झाला. सायंकाळी पुन्हा एकदा सांखळी, केरी, वाळपई आदी भागात जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, हवामान खात्याने राज्यात पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडणार आहे, असे जाहीर करून रेड अलर्ट जारी केला.  मंगळवार व बुधवारी ऑरेंज अलर्ट राहील. रेड अलर्ट म्हणजे मुसळधार पाऊस व तो दीड इंचापासून चार इंचापर्यंत व त्याही पुढे अशा पद्धतीने जोरात पडू शकतो. गेल्या 24 तासांत कोसळलेल्या जोरदार पावसामुळे यंदाची सरासरीची कसर भरून काढली आहे. काल 35 टक्के कमी पाऊस होता तर शनिवारी 24 टक्के अतिरिक्त पाऊस ठरला. गेल्या 24 तासांत मुरगाव अडीच इंच, फोंडा अडीच इंच, दाबोळी अडीच इंच, जुने गोवे दीड इंच, पणजी दीड इंच, म्हापसा सव्वा इंच, वाळपई, पेडणे एक इंच अशी पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासांत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर वाऱ्याचा वेगही वाढलेला असेल. पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिलेला आहे. पावसाबरोबरच राज्यात जोरदार वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 व त्यानंतर त्यात वाढ होऊन ताशी 65 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे
गेल्या 24 तासांत उत्तर गोव्यात अडीच इंच तर दक्षिण गोव्यात सव्वा पाच इंच पावसाची सरासरी नोंद झाली आहे. संपूर्ण गोव्यात सरासरी चार इंच पावसाची नोंद शनिवारी करण्यात आली. एक जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे यंदाच्या मोसमात आतापर्यंत 7 इंच पावसाची नोंद झाली आहे आणि सरासरी 24.5 मिलिमीटर म्हणजेच एक इंच पाऊस अतिरिक्त ठरला आहे