राज्यातील अनेक नेते, होणार शपथविधीचे साक्षीदार

राज्यातील अनेक नेते, होणार शपथविधीचे साक्षीदार

सुदिन, विश्वजित, संकल्प, राजेश, चंद्रकांत, आदी दिल्लीत दाखल
प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज रविवारी नवी दिल्लीत होणाऱ्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गोव्यातील अनेक नेते शनिवारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्याशिवाय अन्य अनेक मान्यवर, उद्योजक, कलाकार यांनीही शपथविधीस उपस्थित राहण्याच्या निमंत्रणावरून दिल्ली गाठली आहे.
या सोहळ्यास उपस्थित राहण्याबरोबरच तत्पूर्वी शुक्रवारी झालेल्या लोकशाही आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हजेरी लावण्यासाठी आघाडीच्या सर्व पक्षांचे प्रमुख नेते, आघाडीचे सर्व खासदार, तसेच आघाडीच्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यापूर्वीच दिल्लीत पोहोचले होते. त्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नवनिर्वाचित खासदार श्रीपाद नाईक तसेच खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचा समावेश होता.
त्यानंतर आता आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी शनिवारी गोव्यातून एनडीएचे घटक असलेल्या मगो पक्षाचे नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री विश्वजित राणे, आमदार चंद्रकांत शेट्यो, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई आदी नेते दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
कावी कलाकार सागर नाईक मुळे खास पाहुणा 
त्याशिवाय गोव्याचा कावी कलाकार सागर नाईक मुळे हाही या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. यापूर्वी तो ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाहुणा बनला होता. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी त्याला प्राप्त झाली होती. आता तिसऱ्यांदा त्याला पंतप्रधान कार्यालयाकडून निमंत्रण मिळाले असून यावेळी तो थेट पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात खास पाहुणा राहणार आहे.