शहापूर-वडगाव भागात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी
युवावर्गाचा उत्साह शिगेला, डीजे तालावर तरुणीही थिरकल्या, बालचमूंच्या आकर्षक वेशभूषांनी वेधले लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
रंगांच्या उधळणीत बेभान होत शहापूर, वडगाव भागातील तरुणाईने रंगपंचमीचा आनंद साजरा केला. पारंपरिक पद्धतीने शनिवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. आकर्षक वेशभूषा, ड्रॅगनचे मुखवटे, शॉवर डान्स व डीजेचा दणदणाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. शनिवार असल्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला.
होळीच्या दुसऱ्या दिवशी बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये रंगोत्सव साजरा झाला. परंतु, शहरालगतच्या शहापूर, वडगाव या उपनगरांमध्ये संस्थानिक काळापासून पारंपरिक पद्धतीने पंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. शुक्रवारपासून रंगपंचमीसाठी युवावर्गाकडून जय्यत तयारी केली जात होती.
शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून शहापूर, वडगावमधील गल्ल्यांमधून रंगांची उधळण सुरू झाली. वडगाव येथील नाझर कॅम्प, कारभार गल्ली, पाटील गल्ली आदी परिसरात डीजेच्या तालावर तरुणांसह तरुणीही थिरकत होत्या. शहापूरमधील भारतनगर, खासबाग सर्कल, नवी गल्ली, आचार्य गल्ली, रयत गल्ली आदी परिसरात डीजेचा दणदणाट सुरू होता. युवा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी शॉवर तसेच स्प्रिंकलर उभारले होते. या स्प्रिंकलरच्या पाण्यावर तरुणाई बेभान होऊन नाचत होती.
पाचवी, आठवी व नववी या वर्गांच्या मूल्यांकन परीक्षा मागील आठवड्यात रखडल्या होत्या. या आठवड्यात मूल्यांकन परीक्षा पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांनीही रंगपंचमीचा आनंद मनसोक्तपणे लुटला. बेळगाव व इतर उपनगरांमधील विद्यार्थीही शहापूर, वडगाव येथे दाखल होऊन रंगपंचमीचा आनंद घेत होते. मंडळांनी स्वागतकमानी उभारून त्यावर आकर्षक सजावट केली होती.
आदर्शनगर-वडगाव येथील संजीविनी फाऊंडेशनतर्फे रंगपंचमी साजरी करण्यात आली. काळजी केंद्रात राहणारे आबालवृद्ध व कर्मचाऱ्यांनी एकमेकांना रंग लावून गाण्यांच्या ठेक्यावर नृत्य केले. संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगिनाळ यांनीही रंगपंचमीचा आनंद घेतला.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे हाल
रंगपंचमी असल्यामुळे शहापूर, वडगावकडे जाणारी बससेवा विस्कळीत झाली होती. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी पालकांना पुढाकार घ्यावा लागला. युवा कार्यकर्त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही अथवा त्यांच्या अंगावर रंग उडणार नाही, याची खबरदारी घेतली.
Home महत्वाची बातमी शहापूर-वडगाव भागात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी
शहापूर-वडगाव भागात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी
युवावर्गाचा उत्साह शिगेला, डीजे तालावर तरुणीही थिरकल्या, बालचमूंच्या आकर्षक वेशभूषांनी वेधले लक्ष प्रतिनिधी/ बेळगाव रंगांच्या उधळणीत बेभान होत शहापूर, वडगाव भागातील तरुणाईने रंगपंचमीचा आनंद साजरा केला. पारंपरिक पद्धतीने शनिवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. आकर्षक वेशभूषा, ड्रॅगनचे मुखवटे, शॉवर डान्स व डीजेचा दणदणाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. शनिवार असल्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही […]