शंकरपेठ पुलावरील साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणे बनले धोकादायक

प्रशासनाचे दुर्लक्ष : वाहनधारकांना धोकादायक वार्ताहर /कणकुंबी खानापूर-जांबोटी रस्त्यावरील शंकरपेठ येथील मलप्रभा नदीवरील पुलावर पावसाचे पाणी साचलेले असून विशेषत: दुचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. जवळपास अर्धा फूट पाणी ब्रिजवर साचलेले असून पुलावरील खड्डेमय रस्त्यामधून गाडी चालवणे म्हणजे दुचाकी वाहनधारकांना धोका निर्माण होऊ शकतो.गेल्या महिन्याभरापासून या पुलावर पाणी साचत असून प्रशासनाने मात्र याची जराही दखल घेतली नाही. गेल्या […]

शंकरपेठ पुलावरील साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणे बनले धोकादायक

प्रशासनाचे दुर्लक्ष : वाहनधारकांना धोकादायक
वार्ताहर /कणकुंबी
खानापूर-जांबोटी रस्त्यावरील शंकरपेठ येथील मलप्रभा नदीवरील पुलावर पावसाचे पाणी साचलेले असून विशेषत: दुचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. जवळपास अर्धा फूट पाणी ब्रिजवर साचलेले असून पुलावरील खड्डेमय रस्त्यामधून गाडी चालवणे म्हणजे दुचाकी वाहनधारकांना धोका निर्माण होऊ शकतो.गेल्या महिन्याभरापासून या पुलावर पाणी साचत असून प्रशासनाने मात्र याची जराही दखल घेतली नाही. गेल्या अनेक दिवसापासून जांबोटी-खानापूर या रस्त्यावरील शंकरपेठ येथील मलप्रभा नदीवर असलेल्या पुलावर खड्डे पडलेले असून साधे पॅचवर्क देखील करण्यात आलेले नाही. त्यातच पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डा कुठे आहे याचा अंदाज देखील मिळत नाही.
त्यामुळे या पुलावरून मार्ग काढताना दुचाकीस्वाराला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. काही वेळेला चारचाकी वाहनसुद्धा पाण्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यात गेल्यास पडेल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. परंतु खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून मात्र याकडे कानाडोळा केला जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला किंवा संबंधित खात्याला जाग येणार का? असा प्रश्न वाहनधारक व प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. येत्या दोन दिवसात या ब्रिजवरील साचलेले पाणी जाण्यासाठी मार्ग काढला नाही तर सध्या कणकुंबी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी तुडुंब भरून वाहिली तर, दुचाकीस्वार किंवा चारचाकी वाहनधारकांना धोका पोहोचू शकतो. तत्पूर्वी अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून या पुलावरील साचलेल्या पाण्याला मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.