बिजगर्णी ग्राम पंचायतीला मिळणार सुसज्ज इमारत

बिजगर्णी ग्राम पंचायतीला मिळणार सुसज्ज इमारत

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांतून इमारतीचे बांधकाम जोमाने : सुमारे 65 ते 70 लाख खर्च अपेक्षित
वार्ताहर /किणये
बिजगर्णी ग्राम पंचायतीला सुसज्ज अशी इमारत मिळणार आहे. बिजगर्णी येथील इंदिरानगरजवळ असलेल्या जागेत इमारतीच्या बांधकामाचे कामकाज जोमाने सुरू आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून या इमारतीचे कामकाज सुरू असून या इमारतीसाठी सुमारे 65 ते 70 लाख इतका खर्च अपेक्षित असल्याची माहिती ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी दिली आहे.
सध्या बेळवट्टी रोड बिजगर्णी येथे बिजगर्णी ग्रामपंचायतीची जुनी इमारत आहे. नागरिकांसाठी ग्रामपंचायतीची सुसज्ज आणि आकर्षक अशी इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या कामकाजाला सुऊवात करण्यात आली आहे. सध्या या इमारतीचे काम कॉलम भरणीपर्यंत आलेले आहे. या कामाची पाहणी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, पीडिओ रविकांत, सदस्य मेहबूब नावगेकर, सागर नाईक यांनी मंगळवारी केली. ग्रामपंचायत इमारतीचे काम सुरू असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
इमारतीत हायटेक सुविधा
बिजगर्णी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप व येळेबैल या चार गावांचा समावेश आहे. तर या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 14 ग्रामपंचायत सदस्य आहेत. ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये विविध हायटेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती पीडीओ रविकांत यांनी दिली आहे.