पीव्ही सिंधूचा विजयी प्रारंभ

पीव्ही सिंधूचा विजयी प्रारंभ

सिंगापूर ओपन बॅडमिंटन : एचएस प्रणॉयचाही संघर्षपूर्ण विजय, श्रीकांत, लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था /सिंगापूर
भारताची स्टार बॅडमिंटनपटू व दोन वेळ ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये शानदार विजयासह पुढील फेरीत प्रवेश केला. पुरुष गटात एचएस प्रणॉयने संघर्षपूर्ण विजयासह दुसरी फेरी गाठली असून अन्य लढतीत मात्र दिग्गज खेळाडू किदाम्बी श्रीकांत व लक्ष्य सेन यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय, मिश्र दुहेरी प्रकारातही भारताचे आव्हान संपुष्टात आले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी महिन्याभराचा कालावधी राहिला असताना सिंधूने मागील आठवड्यात थायलंड ओपनचे उपजेतेपद पटकावले होते. संपूर्ण स्पर्धेत तिची कामगिरी शानदार झाली मात्र अंतिम लढतीत तिला हार पत्करावी लागली. यानंतर  सिंगापूर ओपनमध्ये बुधवारी सिंधूने विजयी प्रारंभ करताना डेन्मार्कच्या होजमार्क काजेर्सफेल्टला 21-12, 22-20 असे नमवले. 44 मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूने सुरेख खेळ साकारला. सिंधूने पहिला गेम सहज जिंकला पण दुसऱ्या गेममध्ये मात्र तिला संघर्ष करावा लागला. एकवेळ दोघींत 18-18, 20-20 अशी बरोबरी होती पण मोक्याच्या क्षणी सिंधूने दोन गुणाची कमाई करत हा सामना जिंकला. आता, दुसऱ्या फेरीत तिच्यासमोर रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन व जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारीनचे आव्हान असेल.
प्रणॉयची विजयी सलामी
युवा खेळाडू एचएस प्रणॉयने बेल्जियमच्या ज्युलियन केरागीला 21-9, 18-21, 21-9 असे नमवत पुढील फेरीत प्रवेश केला. ही लढत 53 मिनिटे चालली. प्रणॉयने या सामन्यात शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. पुरुष गटात वर्ल्ड नं 1 डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसेनने भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनला पहिल्याच फेरीत 21-13, 16-21, 21-13 असे पराभूत केले. 62 मिनिटे चाललेल्या या सामन्यात लक्ष्यने अॅक्सलसेनला चांगलीच टक्कर दिली पण त्याला विजयापर्यंत मात्र पोहोचता आले नाही. याशिवाय, किदाम्बी श्रीकांत जखमी झाल्याने जपानच्या कोडाई नाराओकाविरुद्ध लढतीत त्याने माघार घेतली. मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या एन सिक्की रे•ाr व बी सुमीत यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मलेशियाच्या गो सून व लेई शेवॉन जोडीने भारतीय जोडीला 21-18, 21-19 असे हरवले. याशिवाय, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी जोडीचे आव्हान पहिल्या फेरीत समाप्त झाले आहे.