संगीत संमेलनातून विविध गीतांचे सादरीकरण
आर्ट्स सर्कलतर्फे एकदिवसीय संगीत संमेलन उत्साहात
बेळगाव : आर्ट्स सर्कलतर्फे रविवार दि. 3 मार्च रोजी एकदिवसीय संगीत संमेलन झाले. लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या या संमेलनाची सुरुवात सकाळी 10 वा. झाली. अध्यक्षा लता कित्तूर यांनी कलाकारांचे स्वागत केले. त्यांचा परिचय व प्रात:कालीन सत्राचे सूत्रसंचालन श्रीधर कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी पतियाळा घराण्याच्या गायिका पं. अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या संबर्ती दास यांचे गायन झाले. त्यांनी गायनाची सुरुवात प्रात:कालीन राग तोडीने केली. विलंबित एकतालातील ख्याल, द्रुत तीनतालातील एक बंदिश व त्यानंतर एकतालातील तराना त्यांनी सादर केला. पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले तीर्थ विठ्ठल हे नामदेवांचे भजन सादर करून त्यांनी सांगता केली. त्यांना तबल्यावर विभास सांघाई व संवादिनीवर रवींद्र माने तर तानपुरा साथ पावनी यरसंग यांनी केली.
त्यानंतर पं. उल्हास कशाळकर यांचे शिष्य अलिक सेनगुप्ता यांचे गायन झाले. त्यांनी राग जौनपुरीने प्रारंभ केला. ‘अब रंग घोलिया’ ही विलंबित तिलवाड्यातील बंदिश व द्रुत तीनतालातील एक बंदिश त्यांनी सादर केली. राग अल्हैय्या बिलावलमधील मध्यलय झपतालातील एक बंदिश व द्रुत तीनतालातील तराना त्यांनी सादर केला. सहसा न ऐकायला मिळणाऱ्या अशा राग हिंडोलमधील दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या. पहिली बंदिश मध्यलय रूपक आणि द्रुत बंदिश तीनतालात होती. त्यांना तबल्यावर विभास सांघाई यांनी, संवादिनीवर सारंग कुलकर्णी यांनी व तानपुऱ्यावर निधी केळकर यांनी साथ दिली. यानंतर पहिले सत्र संपले.
सायंकालीन सत्राचे सूत्रसंचालन
अॅड. रवींद्र माने यांनी केले व त्यांनीच कलाकारांचा परिचय करून दिला. लता कित्तूर यांनी त्यांचे स्वागत केले. प्रारंभी अबीर हुसेन यांचे सरोदवादन झाले. त्यांनी प्रारंभी राग शुद्ध कल्याण सादर केला. मध्यलय झपतालातील आणि त्यानंतर द्रुत तीनतालातील दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या. राग शुद्ध पिलूमधून एक धून सादर करून त्यांनी वादनाची सांगता केली. या संमेलनाची सांगता पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने झाली. वसंत ऋतुचे औचित्य साधून त्यांनी राग वसंत सादर केला. विलंबित तिलवाड्यातील ‘नबी के दरबार’ ही पारंपरिक बंदिश त्यांनी सादर केली. अद्वातालातील पं. दिनकर कायकिणी रचित वसंत ऋतुचे वर्णन करणारी बंदिश, त्यानंतर तीनतालामध्ये तराना सादर केला. वसंताच्या जोडीने येणारा राग बहार त्यांनी सादर केला. तसेच मध्यलय तीनतालातील एक बंदिश आणि द्रुत एकतालातील एक बंदिश त्यांनी सादर केली. ‘जमुना के तीर’ या भैरवीने सांगता झाली. त्यांना तबल्यावर अजिंक्य जोशी यांनी तर संवादिनीवर सारंग कुलकर्णी यांनी साथ दिली. रवींद्र माने यांनी आभार मानले.
Home महत्वाची बातमी संगीत संमेलनातून विविध गीतांचे सादरीकरण
संगीत संमेलनातून विविध गीतांचे सादरीकरण
आर्ट्स सर्कलतर्फे एकदिवसीय संगीत संमेलन उत्साहात बेळगाव : आर्ट्स सर्कलतर्फे रविवार दि. 3 मार्च रोजी एकदिवसीय संगीत संमेलन झाले. लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या या संमेलनाची सुरुवात सकाळी 10 वा. झाली. अध्यक्षा लता कित्तूर यांनी कलाकारांचे स्वागत केले. त्यांचा परिचय व प्रात:कालीन सत्राचे सूत्रसंचालन श्रीधर कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी पतियाळा घराण्याच्या गायिका पं. अजय चक्रवर्ती यांच्या […]