जरांगे साहेब आरक्षण घेतल्या शिवाय माघे हाटू नका; चिट्ठी लिहून मराठा आरक्षण आंदोलकाची आत्महत्या

जरांगे साहेब आरक्षण घेतल्या शिवाय माघे हाटू नका; चिट्ठी लिहून मराठा आरक्षण आंदोलकाची आत्महत्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका आंदोलकाने आयुष्याची अखेर करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रसाद देठे (Prasad Dethe) असे या तरुणाचे नाव असून मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी चिट्टी लिहून ठेवत आपले आयुष्य त्यांनी संपवले.
पुण्यात खासगी कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या प्रसाद देठे यांनी स्पष्ट ‘फक्त मराठा आरक्षण मिळावे’ याच हेतूने आपण आत्महत्या करत असून आपल्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचा उल्लेख केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करुन मराठा आरक्षणाची भूमिका हिरीरिने मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. जरांगे पाटील जिंदाबाद…लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, तसेच मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त जरांगे- पाटील, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रसाद देठे यांनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय ?

जयोस्तु मराठा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे.
जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका…विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय….चिऊ मला माफ कर….लेकरांची काळजी घे…धीट रहा.! असे म्हटले आहे.