नंदगड बाजारपेठेतील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

नंदगड बाजारपेठेतील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

महालक्ष्मी यात्रेपूर्वी नंदगड येथील समस्या सोडवाव्यात
वार्ताहर /हलशी
नंदगड येथील कलाल गल्लीमधील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचून चिखल झालेला आहे. हा रस्ता मुख्य बाजारपेठेला जोडणाऱ्या असल्याने या रस्त्यावरुन नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे चिखलातून मार्ग काढत जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून दुचाकी आणि चारचाकी वाहने जाताना या खड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने अनेकवेळा वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. यासाठी रस्त्याची ग्रा.पं.ने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. पुढीलवर्षी 13 फेब्रुवारी 2025 रोजी श्री ग्रामदेवता महालक्ष्मी यात्रा भरविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. नंदगडमध्ये अनेक समस्या आहेत. त्या यात्रेपूर्वी सोडविणे गरजेचे आहे. यासाठी ग्रा.पं.ने आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. नंदगड परिसरातील मुख्य ठिकाण असल्याने येथे 40 गावांचा संपर्क येतो. यासाठी रस्ते दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे.