पूजा शर्माचेच कटकारस्थान

पूजा शर्माचेच कटकारस्थान

सरकारी वकिलाचा ठाम दावा : जामीन अर्ज प्रकरणी उद्या निवाडा
पणजी : आसगाव  येथील आगरवाडेकर यांचे घर पाडण्याच्या प्रकरणात मुख्य  संशयित आरोपी पूजा शर्मा हीच असून ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी रिअल इस्टेट एजन्ट अर्शद ख्वाजा हा तिला मदत करत होता. या गंभीर गुन्हाप्रकरणी शर्मा हिने कटकारस्थान कसे रचले आणि त्यातील पुरावे, माहिती गोळा करण्यासाठी तिची कोठडीत चौकशी होणे गरजेचे असल्याचा जोरदार युक्तिवाद सरकारी वकील दर्शन गावस यांनी काल सोमवारी न्यायालयात मांडला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्याने आता या प्रकरणाचा निवाडा उद्या बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे.पणजीच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयात पूजा शर्मा हिने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर क्राईम ब्रांचने दाखल केलेल्या उत्तरावर सरकारी वकिलाने सोमवारी युक्तिवाद सुरू केला.
आगरवाडेकर यांना बळजबरीने घराबाहेर काढण्याचा प्रयत्न
अॅड. गावस सांगितले की, या जागेचे मूळ मालक पिंटो दाम्पत्याने 2016 साली आगरवाडेकर यांच्याशी विक्रीखत केले आहे. पिंटो यांनी दिलेल्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रामुळेच आसगाव येथील घरावरील हाऊस टॅक्स, वीज आणि पाणी बिलावर आगरवाडेकर यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. आगरवाडेकर यांनी पुढील तीन वर्षे नियमितपणे हाऊस टॅक्सचा भरणा केलेला आहे. या घरात आगरवाडेकर आपल्या कुटुंबासह वास्तव्य करत असून त्यांना बळजबरीने घराबाहेर काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. असा कोणता भारतीय कायदा आहे, की जो राहत्या घरातून बाहेर हाकलण्याचा अधिकार देऊ शकतो, अशी विचारणाही गावस यांनी केली.
पूजाची तपासकामात मदत करण्याची तयारी
पूजा शर्माचे अॅड. सुरेंद्र देसाई यांनी सांगितले की, पोलीस एका बाजूने चौकशी करण्यासाठी फौजदारी कायद्याच्या कलम- 41 (अ) खाली तीन समन्स पाठवतात, आणि त्या समन्सना पूजाने उत्तर दिले असूनही तिला अटक करण्याची तयारी करतात, हे कसे काय शक्य आहे, असा सवाल केला. पोलिसांनी अजूनही चौकशीसाठी पाचारण करावे, आपल्या अशिलाची स्वत: तपासकामाला मदत करण्याची तयारी आहे. गरज पडल्यास ती गोव्यात दाखल होईल, असे देसाई यांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पणजी प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या. इर्शाद आगा यांनी बुधवारी दुपारी निवाडा जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगून कामकाज तहकूब केले.
 सारे कारस्थान पूजा शर्माचेच
आगरवाडेकर कुटुंबाला घराबाहेर काढण्याच्या मागे पूजा शर्मा हिचेच कटकारस्थान आहे, असा आरोप सरकारी वकिलाने केला. यासाठी मनुष्यबळ, अवजड मशिनरी, बाऊन्सर्स आदी आणण्यासाठी पुरेपूर डावपेच आखण्यात आले आहे. या लोकांना आणि अन्य यंत्रे आणण्यासाठी कोणी आदेश दिला, त्यासाठी कोणी- कोणाला पैसे दिले याची माहिती मिळणे आवश्यक आहे. या सर्व घडामोडीने नेमका कोणाला फायदा पोचतो, असा विचार केला असता पूजा शर्मा हिचेच नाव पुढे येते. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी  रिअल इस्टेट एजन्ट अर्शद ख्वाजा हा तिला मदत करत होता. या सर्व घटनेमागे पैशांची देवाणघेवाण, त्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल आणि षडयंत्र कसे रचले याबाबत पूजाची भूमिका समजण्यासाठी कोठडीत चौकशी होणे गरजेचे असल्याने तिला अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारी वकिलाने केली.
 मुख्यमंत्र्यांकडून राजकीय हस्तक्षेप नसून सामान्यांसाठी कळवळा
एका गरीब गोमंतकीयाचे घर जबरदस्तीने पाडण्यात आल्याचे कळल्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुसऱ्या दिवशी रात्री भरपावसात धाव घेऊन त्या कुटुंबाला दिलासा देणे, म्हणजे राजकीय हस्तक्षेप होत नाही. सामान्यांसाठी कळवळा असल्याने स्थानिकांना संरक्षण आणि गंभीर प्रसंगात धीर देण्यासाठी मुख्यमंत्री तेथे पोचले होते. या प्रकरणी बेकायदेशीरपणे कोणी कायदा हातात घेत असल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, तपासात कधीही राजकीय ढवळाढवळ झालेली नसल्याचा दावा सरकारी वकील गावस यांनी केला.