यल्लम्मा डोंगरावर भाविकांची रीघ

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यात्रा गुरुवारपासून दहा दिवस चालणार वार्ताहर /बाळेकुंद्री लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा गुरुवारपासून दहा दिवस चालणार आहे. गुरुवार दि. 25 रोजी शाकंभरी पौर्णिमा असल्याने तसेच यात्रेचा मुख्य दिवस असल्याने या दिवशी चार-पाच लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी धारवाड व बेळगावमार्गे विशेष बस सोडण्यात आल्या आहेत. […]

यल्लम्मा डोंगरावर भाविकांची रीघ

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यात्रा गुरुवारपासून दहा दिवस चालणार
वार्ताहर /बाळेकुंद्री
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा गुरुवारपासून दहा दिवस चालणार आहे. गुरुवार दि. 25 रोजी शाकंभरी पौर्णिमा असल्याने तसेच यात्रेचा मुख्य दिवस असल्याने या दिवशी चार-पाच लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी धारवाड व बेळगावमार्गे विशेष बस सोडण्यात आल्या आहेत. शाकंभरी उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजाळून निघाला आहे. गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस असला तरी चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश व बेळगाव तालुका परिसरातील लाखो भाविकांचे लोंढेच्या लोंढे डोंगरावर येत आहेत.  डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पुंडात भाविक स्नानासाठी गर्दी करत आहेत. भक्त बैलगाडी व पदयात्रेनेही डोंगरावर येत आहेत. डोईवर यल्लम्मा मूर्ती घेऊन चौंडकं वाजवित भक्तगण कडूनिंब धारण करून देवीला दीड नमस्कार घालून नवस फेडण्यासाठी, भंडाऱ्याची उधळण करत देवीचा जयघोष करीत येत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून बस, कार, टमटम रिक्षा, टॅक्टर, मोटारसायकल वाहनांसह भक्तांनी मंगळवारी डोंगर फुलून गेला होता.
सुविधेची विशेष व्यवस्था
डोंगरावर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन देवस्थान प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कार्यनिर्वाहक अधिकारी एसपीबी महेश यांनी दिली. डोंगरावर भाविकांना पाण्याची सुविधा पुरविली असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेत चार-पाच लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहणार असून भाविकांना सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले आहे. बसची सोय, वसती निवास, शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, फिरता दवाखाना, जनावरे तपासणी केंद्र, सुलभ दर्शनाची व्यवस्था, समर्पक विद्युत दिव्यांची सोय, वीज व स्वच्छता आदी सुविधा पुरविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. यात्राकाळात चोरीचे प्रकार घडत असतात, याकडे लक्ष देऊन 500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यंदा मंदिर व स्नानपुंड परिसरात नव्याने पन्नास सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात आले आहेत. देवस्थान परिसरात भाविकांकडून टाकण्यात येणारे शिळे अन्न, खाद्यपदार्थ जागेवरच टाकण्यात येत असल्यामुळे परिसरात दुर्गंधीला सामोरे जावे लागते. दुर्गंधी फैलावू नये म्हणून ठिकठिकाणी कचरा कंटेनरचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी परिसर स्वच्छतेची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी भारत लाईव्ह न्यूज मीडियाशी बोलताना व्यक्त केले.