न करताच अर्ज, लाखोंचे ऑनलाईन कर्ज!

न करताच अर्ज, लाखोंचे ऑनलाईन कर्ज!

अनगोळ येथील दुकानदाराच्या नावे भलत्यांनीच उचलली रक्कम : दोघांना अटक
बेळगाव : अनगोळ येथील एका दुकानदाराच्या नावे त्याला माहिती नसताना तब्बल 3 लाख 80 हजार रुपये ऑनलाईन कर्ज काढणाऱ्या दोघा जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रवीण बाळाप्पा मल्लण्णावर (वय 28) रा. मारिहाळ, विनोद गुरुलिंगय्या हिरेमठ (वय 32) रा. रुक्मिणीनगर अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. खरेतर टिळकवाडी पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हद्दीच्या आधारावर माळमारुती पोलिसांना तो वर्ग करण्यात आला. त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. प्रकाश राजाराम घोडके, रा. चौथे रेल्वेगेटजवळ, अनगोळ यांनी 30 ऑक्टोबर 2023 रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. 12 सप्टेंबर 2023 रोजी प्रकाश यांच्या नावे अंजनेयनगर येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत 3 लाख 80 हजार रुपये कर्ज उचलले होते. यापैकी 2 लाख 90 हजार रुपये रक्कम काढण्यात आली होती. मोबाईलवरून आलेल्या मेसेजमुळे प्रकाश यांना हा प्रकार कळाला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका पे अॅपवर प्रकाश यांनी कर्ज उचलले होते. यापैकी 17 हजार रुपये शिल्लक होते. ‘17 हजार रुपये भरा, तुम्हाला 3 लाख रुपयांहून अधिक कर्ज देऊ’, अशी त्यांना विचारणा करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केलेला प्रवीण हा तरुण पे अॅपचा कर्मचारी आहे. प्रकाश यांनी कर्ज घेण्यास नकार दिला. प्रवीण व विनोद या दोघा जणांनी पे अॅपवर कर्ज मिळविण्यासाठी प्रकाश यांनी दिलेल्या कागदपत्रांचा वापर करून अंजनेयनगर येथील आयसीआयसीआय बँकेत 3 लाख 80 हजार रुपये कर्ज उचलले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रवीण व विनोद या दोघा जणांवर भादंवि 420, 465, 471 कलमान्वये टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करून पुढील तपासासाठी हे प्रकरण माळमारुती पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कर्ज प्रकरणाचा छडा लावून प्रवीण व विनोद यांना अटक केली आहे. या दोघा जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.
फसवणुकीचा पर्दाफाश …

आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत 3 लाख 80 हजार रुपये  घेतले कर्ज
मोबाईलवरून आलेल्या मेसेजमुळे रक्कम काढल्याचा प्रकार उघड
30 ऑक्टोबर 2023 रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात दिली होती फिर्याद