हेरगिरीच्या आरोपाखाली गुजरातमधून एकाला अटक

हेरगिरीच्या आरोपाखाली गुजरातमधून एकाला अटक

गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याचे उघड
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली गुजरातमधील भरूच जिल्ह्यातून सीआयडीने गुरुवारी एका तरुणाला अटक केली. गुजरात सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मिश्रा नावाचा हा तरुण मूळचा बिहारमधील मुझफ्फरपूरचा असून तो गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे राहतो. आरोपी भारतीय लष्कर आणि संरक्षण संशोधन आणि विकास कंपन्यांशी संबंधित गोपनीय माहिती व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानला पाठवत होता. लष्करी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीआयडीने ही कारवाई केली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी (आयएसआय) हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली प्रवीण मिश्राला अटक केल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली. हनीट्रॅपला बळी पडल्यानंतर आरोपी प्रवीण मिश्राने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) बनवलेल्या ड्रोनची महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला दिली. उधमपूरमधून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सीएसएल सीआयडी क्राईमने भरूचजवळील अंकलेश्वरमधील एका कारखान्यावर पाळत ठेवली. यादरम्यान प्रवीण मिश्राच्या वर्तणुकीवर संशय आल्यानंतर त्याचा फोन तपासण्यात आला. यात त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती शेअर केल्याचे दिसून आले आहे. यातील मुख्य आरोपी ही पाकिस्तानमधील आयएसआय हँडलर असून तिने स्वत:ची ओळख सोनल गर्ग अशी केल्याचे गुजरात सीआयडीचे एडीजीपी राजकुमार पांडियन यांनी सांगितले.
गुप्तहेर बिहारचा रहिवासी
प्रवीण मिश्रा हा मूळचा बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे. सध्या तो भऊच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे राहून देशाविऊद्ध गुन्हेगारी कट रचण्यासाठी व्हॉट्सअॅप कॉल्स आणि ऑडिओद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता. आरोपी प्रवीण मिश्राविऊद्ध आयपीसी कलम 123, आयटी अॅक्ट आणि कट रचण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
आणखी काही कर्मचारीही जाळ्यात
आयएसआय हँडलर महिलेने प्रवीण मिश्राला आपण आयबीएम चंदीगडमध्ये काम करत असल्याचे सांगितले होते. तिने प्रवीण मिश्राला हनीट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून भारताच्या संरक्षणाशी संबंधित माहिती मिळवली. संरक्षण आस्थापनांसाठी काम करणाऱ्या इतर अनेक कर्मचाऱ्यांनाही आयएसआयने लक्ष्य केले आहे. सुरक्षा यंत्रणांनी सीआयडीला सुरक्षा दलातील सध्याच्या किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांबद्दल अलर्ट केले होते. गोपनीय माहिती मिळविण्यासाठी डीआरडीओ, एचएएल आणि क्षेपणास्त्र प्रणालीच्या संशोधन आणि विकासाशी संबंधित कर्मचाऱ्यांचा वापर केला जात असल्याचे सीआयडीने सांगितले.