आता ग्रामपंचायतींमध्ये दिसणार महिला प्लंबर

नल, जल मित्र उपक्रम : महिला सबलीकरणाला प्राधान्य : जिल्ह्यात 650 महिलांची निवड : 250 महिलांना प्रशिक्षण बेळगाव : कौशल्य विकास उद्यमशिलता आणि जीवनोपाय खात्याकडून महिला सबलीकरणाला प्राधान्य देऊन कौशल्य शिक्षण घेतलेल्या महिलांना ग्राम पंचायतींमध्ये प्लंबर म्हणून नेमणूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आता ग्रा. पं. मध्ये महिला प्लंबर दिसणार असून जिल्ह्यामध्ये 500 ग्राम पंचायतीत 1000 महिला प्लंबरची नेमणूक करण्यात येणार आहेत. 650 महिलांची नावे […]

आता ग्रामपंचायतींमध्ये दिसणार महिला प्लंबर

नल, जल मित्र उपक्रम : महिला सबलीकरणाला प्राधान्य : जिल्ह्यात 650 महिलांची निवड : 250 महिलांना प्रशिक्षण
बेळगाव : कौशल्य विकास उद्यमशिलता आणि जीवनोपाय खात्याकडून महिला सबलीकरणाला प्राधान्य देऊन कौशल्य शिक्षण घेतलेल्या महिलांना ग्राम पंचायतींमध्ये प्लंबर म्हणून नेमणूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आता ग्रा. पं. मध्ये महिला प्लंबर दिसणार असून जिल्ह्यामध्ये 500 ग्राम पंचायतीत 1000 महिला प्लंबरची नेमणूक करण्यात येणार आहेत. 650 महिलांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी 250 महिला प्लंबरांची यादी निश्चित करून प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक ग्रा. पं. मधून दोन महिलांची निवड केली जाणार आहे.
कर्नाटक राज्य ग्रामीण जीवनोपाय व संवर्धन विभागाकडून महिला सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण घेतलेल्या अथवा या प्रकारचे शिक्षण घेतलेल्या महिलांना ग्राम पंचायतींमध्ये प्लंबर म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पिण्याचे पाणी आणि स्वच्छता खाते, कौशल्य विकास उद्यमशिलता आणि जलजीवन मिशन योजनेंतर्गत नल, जल मित्र उपक्रमांतर्गत महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत देशामध्ये 12.82 कोटी घरांना पाणीपुरवठा केला जात आहे. सदर पाणीपुरवठ्याकडे अधिक लक्ष देण्यात आले असून या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी मंत्रालयाकडून विशेष दखल घेण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण जबाबदारी ग्रा. पं. वर सोपविण्यात आली आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्यमशिलता खात्याच्या सहयोगाने नल, जल मित्र उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी प्लंबिंग, इलेक्ट्रिकल वर्क आदी कामांसाठी कुशल मनुष्य बळाचा वापर केला जाणार आहे. यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. प्रत्येक ग्रा. पं. मधून दोन महिलांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. राज्य जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता खाते, कर्नाटक कौशल्य विकास निगम यांच्या अंतर्गत याची अंमलबजावणी केली जात आहे. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये ही नेमणूक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
ग्रा. पं. ला 15 व्या वित्त आयोगातून द्यावे लागणार अनुदान
प्रशिक्षणाची निवड झालेल्या दोन महिला उमेदवारांना प्रत्येकी 24,790 रुपयेप्रमाणे 49,580 रुपये प्रशिक्षण खर्च येणार असून हा खर्च संबंधित ग्रा.पं.ना 15 व्या वित्त आयोगातून करावा लागणार आहे.