हिंडलगा पंपिंग स्टेशनमधील लहान पंप हलविले

एलअॅण्डटीकडून कार्यवाही; पथक सज्ज : पाणी उकळून पिण्याचे नागरिकांना आवाहन बेळगाव : आठ-दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातही अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे जलाशय पूर्ण भरला आहे. त्यामुळे जलाशयाचे तीन दरवाजे दहा इंचांनी तर चौथा दरवाजा चार इंचांनी उचलण्यात आला आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीत होऊ लागला आहे. त्यामुळे […]

हिंडलगा पंपिंग स्टेशनमधील लहान पंप हलविले

एलअॅण्डटीकडून कार्यवाही; पथक सज्ज : पाणी उकळून पिण्याचे नागरिकांना आवाहन
बेळगाव : आठ-दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातही अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे जलाशय पूर्ण भरला आहे. त्यामुळे जलाशयाचे तीन दरवाजे दहा इंचांनी तर चौथा दरवाजा चार इंचांनी उचलण्यात आला आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीत होऊ लागला आहे. त्यामुळे नदीकाठावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंडलगा येथील पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन एलअॅण्डटी कंपनीने पथक कार्यरत केले आहे. शिवाय खबरदारी म्हणून लहान पंपसेट हलविण्यात आले आहेत. पाण्याची पातळी वाढल्यास मोठे पंपसेटही हलविण्याची तयारी करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत पंपिंग स्टेशनला पाण्याचा वेढा आला आहे. यासाठी खबरदारी म्हणून एक पथक तैनात करण्यात आले आहे. राकसकोप जलाशयातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग झाल्यास पंपिंग स्टेशनमध्ये जादा पाणी शिरणार आहे. दरम्यान, शहरातील पाणीपुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी एलअॅण्डटीकडून प्रयत्न सुरू आहेत. पंपिंग स्टेशनमध्येच पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण यंत्रणेत अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शहरातील नळांना गाळ मिश्रित पाणी येण्याची शक्यता आहे. सध्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व इतर आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी शहरवासियांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहनही एलअॅण्डटीने केले आहे. तसेच शहराच्या पाणीपुरवठ्यातही व्यत्यय येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी चार दिवसाआड पाण्याचा पुरवठाही होत आहे.त्यामुळे नागरिकांनी पाण्याची बचत करून वापर करावा, असेही कळविण्यात आले आहे.