सगळ्यात मी सारख्या प्रमाणात आहे
अध्याय पहिला
हे सर्व चराचर विश्व ब्रह्मव्याप्त आहे परंतु माणसाच्या मनात असलेल्या आपपर भावाने त्याला सर्वत्र ब्रह्माची प्रचीती येत नाही. बाप्पा हे ब्रह्माचं सगुण रूप असल्याने सजीव निर्जीव सृष्टी ही बाप्पांचीच निर्मिती आहे. बाप्पा आपल्या सर्वांचे कुटुंबप्रमुख आहेत. म्हणून बाप्पा म्हणतात, सगळ्यांच्यात माझं बीज पहायला शिका. म्हणजे तुमच्यातील आपपर भाव आपोआप कमी होईल. मनुष्याने त्याच्या मनातील सुख-दु:ख, क्रोध, हर्ष, भीती या भाव भावनांचे ठिकाणीही समान असावे. त्यासाठी आत्मस्वरूपात स्थिर होऊन शरीर भोगत असलेल्या सुखदु:खांकडे अलिप्तपणे पहायला शिकलं पाहिजे. बाप्पा पुढं म्हणाले, सुखदु:खाच्या प्रसंगी तू त्यापासून अलिप्त रहा. सगळ्यात मी सारख्या प्रमाणात आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. त्यादृष्टीने कुणाच्या मनात काहीही शंका राहू नये म्हणून बाप्पा पुढील श्लोकात त्याबद्दल सविस्तर सांगत आहेत.
समो मां वस्तुजातेषु पश्यन्नन्तर्बहि स्थितम् ।
सूर्ये सोमे जले वह्नौ शिवे शक्तौ तथानिले ।। 44।।
द्विजे हृदि महानद्यां तीर्थे क्षेत्रे घनाशिनि ।
विष्णौ च सर्वदेवेषु तथा यक्षोरगेषु च ।। 45 ।।
गन्धर्वेषु मनुष्येषु तथा तिर्यग्भवेषु च ।
सततं मां हि य पश्येत्सोयं योगविदुच्यते ।। 46।।
अर्थ- सर्व वस्तुमात्राचे ठिकाणी, आत व बाहेर मी सारख्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेणारा सूर्य, चंद्र, उदक, अग्नि, शिव, शक्ति, वायु, ब्राह्मण, हृदय, महानदी, तीर्थ, पापनाशक क्षेत्र, विष्णु, सर्व देव, यक्ष, नाग, गंधर्व, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादि मनुष्येतर जीव यांचे ठिकाणी मी स्थित आहे हे लक्षात घेऊन सर्वत्र व नेहमीच जो मला त्यांच्यात पाहतो, त्याला योगी म्हणतात कारण तो योगावित् म्हणजे योगज्ञानी असतो. त्यामुळे तो माझ्याशी सदैव जोडला गेलेला असतो. विवरण- परमेश्वराने हे सर्व विश्व त्याच्या लीलेतून तयार केले आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मितीही त्यानेच केलेली आहे. ह्या ईश्वरनिर्मित सर्व पात्रांना हालचाल करता यावी म्हणून त्यामध्ये चैतन्यही त्यांनीच पुरवले आहे. साहजिकच आहे की हे सर्व त्यांनी त्यांचा जीव ओतून तयार केले आहे. त्यामुळे त्या सर्व वस्तुत ते समप्रमाणात भरून राहिले आहेत. समप्रमाणात म्हणजे एकाच मापाने असे नसून ज्याला जेव्हढ्या चैतन्याची आवश्यकता आहे तेव्हढे त्यांनी प्रत्येकाला पुरवले आहे. सूर्य, चंद्र, उदक, अग्नि, शिव, शक्ति, वायु, ब्राह्मण, हृदय, महानदी, तीर्थ, पापनाशक क्षेत्र, विष्णु, सर्व देव, यक्ष, नाग, गंधर्व, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादि मनुष्येतर जीव त्यानुसार त्यांची त्यांची कार्ये करत असतात. चैतन्य पुरवण्याबद्दल बोलायचे झाले तर मुंगीला एक साखरेचा दाणा वाहून न्यायला जेव्हढे चैतन्य आवश्यक आहे तेव्हढे त्यांनी मुंगीला दिले आहे तर हत्तीला त्याच्या देहाच्या आकारमानानुसार कामे करण्यासाठी आवश्यक ते चैतन्य पुरवले आहे. वाघ, सिंह ह्यासारख्या हिंस्त्र पशूंना त्यांचे कार्य करण्याएव्हढे चैतन्य त्यांनी पुरवले आहे. वरील तीन श्लोकात बाप्पांनी विश्वातील बहुतेक सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे आणि जयांचा ह्यात समावेश नाही त्या सर्व वरील वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या वस्तू आहेत. योगी ईश्वराशी सदैव जोडला गेलेला असल्याने ह्या सर्व गोष्टी जाणून असतो. शेवटी बाप्पा त्यांचं निर्णायक मत देत आहेत ते असं,
संपराहृत्य स्वार्थेभ्य इन्द्रियाणि विवेकत ।
सर्वत्र समताबुद्धि स योगो भूप मे मत ।। 47।।
अर्थ-आपापल्या शब्द, स्पर्श इत्यादि अर्थांपासून इंद्रिये विवेकाने मागे ओढून घेऊन सर्वत्र समत्वबुद्धि ठेवणे हा योग, राजा, मला संमत आहे.
क्रमश:
Home महत्वाची बातमी सगळ्यात मी सारख्या प्रमाणात आहे
सगळ्यात मी सारख्या प्रमाणात आहे
अध्याय पहिला हे सर्व चराचर विश्व ब्रह्मव्याप्त आहे परंतु माणसाच्या मनात असलेल्या आपपर भावाने त्याला सर्वत्र ब्रह्माची प्रचीती येत नाही. बाप्पा हे ब्रह्माचं सगुण रूप असल्याने सजीव निर्जीव सृष्टी ही बाप्पांचीच निर्मिती आहे. बाप्पा आपल्या सर्वांचे कुटुंबप्रमुख आहेत. म्हणून बाप्पा म्हणतात, सगळ्यांच्यात माझं बीज पहायला शिका. म्हणजे तुमच्यातील आपपर भाव आपोआप कमी होईल. मनुष्याने त्याच्या […]