रेल्वेमार्गांवर दरड कोसळल्याने लोंढा-वास्को रेल्वेसेवेत व्यत्यय

रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तात्काळ अडथळे हटवून वाहतूक केली सुरळीत बेळगाव : बेळगावसह पश्चिम घाटात सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याची घटना लोंढा-वास्को या रेल्वेमार्गावर घडली. दूधसागर ते सोनाळी रेल्वेस्थानकांदरम्यान दरड कोसळून माती रेल्वेमार्गावर आली. तर लोंढा-तिनईघाट मार्गावर झाडे कोसळली होती. यामुळे पहाटेच्या सुमारास लोंढ्याहून गोव्याच्या दिशेने रेल्वेवाहतूक थांबविण्यात आली होती. दूधसागरनजीक […]

रेल्वेमार्गांवर दरड कोसळल्याने लोंढा-वास्को रेल्वेसेवेत व्यत्यय

रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तात्काळ अडथळे हटवून वाहतूक केली सुरळीत
बेळगाव : बेळगावसह पश्चिम घाटात सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याची घटना लोंढा-वास्को या रेल्वेमार्गावर घडली. दूधसागर ते सोनाळी रेल्वेस्थानकांदरम्यान दरड कोसळून माती रेल्वेमार्गावर आली. तर लोंढा-तिनईघाट मार्गावर झाडे कोसळली होती. यामुळे पहाटेच्या सुमारास लोंढ्याहून गोव्याच्या दिशेने रेल्वेवाहतूक थांबविण्यात आली होती. दूधसागरनजीक दरड कोसळण्याची घटना घडताच या मार्गावरील वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली. यामुळे काही एक्स्प्रेस सोनाळी, लोंढा, अळणावर व बेळगाव रेल्वेस्थानकात थांबविण्यात आल्या. निजामुद्दिन-वास्को एक्स्प्रेस मध्यरात्री बेळगाव रेल्वेस्थानकामध्ये थांबविण्यात आली होती. दरड हटविण्याचे काम नैर्त्रुत्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ सुरू केले. याबरोबरच प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पाणी तसेच अल्पोपाहार रेल्वेकडून प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आला. प्रवाशांना गरज असल्यास परिवहन मंडळाच्या बसेसची व्यवस्था रेल्वेस्थानकांवर करण्यात आली होती. रेल्वेचे जनरल मॅनेजर अरविंद श्रीवास्तव यांसह इतर वरिष्ठ अधिकारी दरड बाजूला करण्याचे काम करत होते. पहाटे 5.30 वाजता दरड व झाडे रेल्वेमार्गावरून दूर करण्यात आल्यानंतर रेल्वेवाहतूक सुरळीत झाली. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.