लाळ्या प्रतिबंधक मोहिमेला प्रारंभ

जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न : जिल्ह्यात 1 एप्रिलपासून घरोघरी मोहीम बेळगाव : जिल्ह्यात 1 एप्रिलपासून लाळ्या खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. चार वर्षांवरील सर्व जनावरांना घरोघरी जाऊन लस टोचली जाणार आहे. संबंधित पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे. जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी खात्यामार्फत प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार […]

लाळ्या प्रतिबंधक मोहिमेला प्रारंभ

जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न : जिल्ह्यात 1 एप्रिलपासून घरोघरी मोहीम
बेळगाव : जिल्ह्यात 1 एप्रिलपासून लाळ्या खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. चार वर्षांवरील सर्व जनावरांना घरोघरी जाऊन लस टोचली जाणार आहे. संबंधित पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे. जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी खात्यामार्फत प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण अभियानांतर्गत प्रत्येक जनावरांपर्यंत लस पोहोचविली जाणार आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरे आहेत. यापैकी 13 लाख 93 हजार जनावरांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबत सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना करून योग्य तो लसीकरणाचा पुरवठा करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांत लम्पी रोगामुळे पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रतिबंधक लसीकरण वेळोवेळी हाती घेतले जात आहे. लम्पी प्रतिबंधक, ब्रुसेलोसीस प्रतिबंधक आणि त्यानंतर आता लाळ्या प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे. एकूणच जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लाळ्या हा भयानक रोग असून लागण झाल्यास तोंडाला पुरळ उठून जनावर अशक्य बनते. दूध क्षमता कमी होवून रोगाची तीव्रता वाढल्यास जनावर दगावते. त्यामुळे पशुपालकांनी खबरदारी म्हणून सर्व जनावरांना लाळ्या प्रतिबंधक लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. विशेषत: जनावरांच्या गोठ्यात जावून ही लस दिली जाणार आहे.
गैरसमजुतीमुळे लसीकरणाला फटका
काही पशुपालकांच्या मनामध्ये गैरसमजुती असल्याने लसीकरणाला प्रतिसाद कमी मिळू लागला आहे. या लसीमुळे दूध क्षमता कमी होते. जनावरे आजारी पडते. गाभण जनावराला लस करून घेण्यास नकार दिला जातो. आदी गैरसमजुतींमुळेच जनावरे लसीकरणापासून वंचित राहू लागली आहेत. पशुपालकांनी कोणताही मनात गैरसमज न ठेवता सर्व जनावरांना लसीकरण करून देणे गरजेचे आहे.
पशुपालकांनीही सहकार्य करावे
जिल्ह्यात 1 एप्रिलपासून लाळ्या प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. यासाठी लसीकरण पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांना करण्यात आला आहे. शिवाय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. पशुपालकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
– डॉ. यरगट्टी-पशुवैद्यकीय अधिकारी