दहावी परीक्षेत कोल्हापूर विभाग राज्यात व्दितीय! कोल्हापूर विभागाचा निकाल 97.45 टक्के

दहावी परीक्षेत कोल्हापूर विभाग राज्यात व्दितीय! कोल्हापूर विभागाचा निकाल 97.45 टक्के

कोल्हापूर जिल्ह्याचा 98.20 टक्के निकाल असून विभागात प्रथम; सातारा जिल्ह्याचा 97.19 टक्के विभागात व्दितीय, सांगली जिल्ह्याचा 96.66 टक्के असून विभागात तृतीय

कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर झाला. राज्याचा निकाल 95.81 टक्के लागला असून कोकणचा 99.1 तर कोल्हापूर विभागाचा निकाल 97.45 टक्के लागला असून सलग दुसऱ्यांदा राज्यात व्दितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच कोल्हापूर विभागीय मंडळात कोल्हापूर जिल्ह्याचा 98.20 टक्के निकाल लागला असून प्रथम, सातारा 97.19 टक्के निकाल विभागात व्दितीय, तर सांगलीचा 96.66 टक्के निकाल लागला असून विभागात तृतीय क्रमांक मिळवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 0.72 ने निकालात वाढ झाली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 1.71 टक्केनी अधिक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह कोल्हापूर विभागात मुलींनीच बाजी मारली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर विभागीय मंडळात 356 परीक्षा केंद्रावर झालेल्या दहावीच्य परीक्षेत 1 लाख 27 हजार 818 पैकी 1 लाख 24 हजार 567 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 97.45 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 52 हजार 853 विद्यार्थ्यांपैकी 51 हजार 905 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 98.20 टक्के निकाल लागला आहे. सातारा जिल्ह्यात 37 हजार 510 विद्यार्थ्यांपैकी 36 हजार 108 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 97.19 टक्के निकाल लागला आहे. सांगली जिल्ह्यात 37 हजार 815 विद्यार्थ्यांपैकी 36 हजार 554 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 96.66 टक्के निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 1.71 टक्के जास्त आहे. यंदा कोल्हापूर विभागात गैरप्रकार करणाऱ्या 7 विद्यार्थ्यांची संबंधीत विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. यंदा 66 हजार 425 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 96.66 टक्के प्रमाण आहे. तर 58 हजार 142 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून 98.27 टक्के प्रमाण आहे. त्यामुळे मुलांपेक्षा 1.71 टक्के मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. दहावीचा ऑनलाईन निकाल मंडळाच्या www.स्aप्aप्ssम्ंद्.ग्ह या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल फाहण्यासाठी दहावीच्या परीक्षेचा रोलनंबर व आईचे नाव असणे आवश्यक आहे. गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुतर्मल्यांकन करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. त्यासाठी 28 मे ते 11 जून या कालावधीत नियोजित शुल्क भरून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी श्रेणी व गुणसुधार परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी 31 मे पासून राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचा आहे. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी केले आहे. यावेळी सहसचिव डी. एस. पोवार, सहाय्यक सचिव एस. बी. चव्हाण, प्रभारी शिक्षण उपसंचालक स्मिता गौड,सांगली शिक्षणाधिकारी आर. एम. लोंढे, सातारा शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, कोल्हापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, लेखाधिकारी एन. डी. पाटील, अधीक्षक एस, वाय. दुधगावकर, एम. आर. शिंदे, सहाय्यक अधीक्षक जे. एस. गोंधळे, जे. आर. तिवले आदी उपस्थित होते.
सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी
दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार सवलतीचे गुण दिले जातात. कोल्हापूर विभागात चित्रकलेसाठी 22 हजार 782, लोककलेसाठी 4 हजार 195, शास्त्रीय कलेसाठी 398 आणि क्रीडासाठी 3 हजार 598 असे एकूण 30 हजार 973 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
एटीकेटी सुविधा
दहावी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या एक वा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीप्रमाणे ‘एटीकेटी’ची सुविधा लागू केली आहे. यामध्ये कोल्हापूर विभागीय मंडळाच्या … विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
जिल्हानिहाय दहावीचा निकाल
जिल्हा प्रविष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी
कोल्हापूर 52853 51905 98.20
सातारा 37150 36108 97.19
सांगली 37815 36554 96.66
एकूण 127818 124567 97.45