जेबॉर, वोझ्नियाकी यांचे आव्हान समाप्त
अँड्रीव्हा, टिमोफीव्हा, कोको गॉफ, साबालेन्का, सित्सिपस, सिनर, कार्लोस अल्कारेझ यांची आगेकूच
वृत्तसंस्था/ मेलबर्न
माजी चॅम्पियन कॅरोलिन वोझ्नियाकी, सहावी मानांकित ऑन्स जेबॉर यांना ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पात्रता फेरीतून आलेल्या युवा खेळाडूंकडून पराभवाचा धक्का बसला. मारिया टिमोफीव्हा, 16 वर्षीय मिरा अँड्रीव्हा यांच्यासह कार्लोस अल्कारेझ, यानिक सिनर, स्टेफानोस सित्सिपस, आर्यना साबालेन्का व कोको गॉफ यांनी आगेकूच केली.
माजी ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीला दुसऱ्या फेरीतच अनपेक्षित पराभवामुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले. रशियाच्या पात्रता फेरीतून आलेल्या मारिया टिमोफीव्हाने तिला 1-6, 6-4, 6-1 असे नमवित तिसरी फेरी गाठली. वोझ्नियाकीने 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. टिमोफीव्हाची पुढील लढत अॅलिना कॉर्नीव्हा किंवा बियाट्रिझ हदाद माइया यापैकी एकीशी होईल. अन्य एका सामन्यात सहाव्या मानांकित ट्युनिशियाच्या ऑन्स जेबॉरला 16 वर्षीय मिरा अँड्रीव्हाने चकित केले. मिरा पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत असून जेबॉरवर तिने 6-0, 6-2 अशी एकतर्फी मात केली. जागतिक क्रमवारीत 47 व्या स्थानावर असणाऱ्या मिराने गेल्या वर्षी विम्बल्डनमध्ये चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.
पुरुष एकेरीत ग्रीसच्या सित्सिपसने जॉर्डन थॉम्पसनवर चार सेट्सच्या चुरशीच्या लढतीत 4-6, 7-6 (8-6), 6-2, 7-6 (7-4) अशी मात केली. सुमारे साडेतीन तास ही झुंज रंगली होती. इटलीचा टेनिस सेन्सेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौथ्या मानांकित यानिक सिनरने हॉलंडच्या पात्रता फेरीतून आलेल्या जेस्पर डी जाँगचा 6-2, 6-2, 6-2 असा पावणेदोन तासाच्या खेळात पराभव करून तिसरी फेरी गाठली. सामन्यानंतर सिनरने जाँगच्या खेळाचे कौतुकही केले. सिनरची पुढील लढत सेबॅस्टियन बाएझ किंवा कोलंबियाचा डॅनियल इलाही गॅलन यापैकी एकाशी होईल.
अन्य एका सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने दुसरी फेरी गाठताना फ्रान्सच्या अनुभवी रिचर्ड गॅस्केटचा 7-6, (7-5), 6-1, 6-2 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. गॅस्केटने पहिल्या सेटमध्ये कार्लोसला झगडण्यास भाग पाडले. पण नंतरच्या दोन सेट्समध्ये कार्लोसने एकतर्फी यश मिळविले.
महिला एकेरीच्या अन्य सामन्यात विद्यमान विजेत्या बेलारुसच्या दुसऱ्या मानांकित आर्यना साबालेन्काने सलग दुसऱ्या सामन्यात पात्रता फेरीतून आलेल्या किशोरवयीन खेळाडूंवर सहज मात केली. ब्रेन्डा फ्रुहवर्टोव्हाचा 6-3, 6-2 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. 2013 मध्ये व्हिक्टोरिया अझारेन्काने या स्पर्धेचे जेतेपद स्वत:कडे राखण्यात यश मिळविले होते. साबालेन्का तिच्यानंतर असा पराक्रम करणारी पहिली खेळाडू होण्याचा प्रयत्न करीत आहे.
अमेरिकन ओपन चॅम्पियन चौथ्या मानांकित कोको गॉफने तिसरी फेरी गाठताना आपल्याच देशाच्या कॅरोलिन डोलहिडेचा 7-6 (7-2), 6-2 असा पराभव केला. तिची पुढील लढत अमेरिकेच्याच अॅलीसिया पार्क्सशी होणार आहे.
Home महत्वाची बातमी जेबॉर, वोझ्नियाकी यांचे आव्हान समाप्त
जेबॉर, वोझ्नियाकी यांचे आव्हान समाप्त
अँड्रीव्हा, टिमोफीव्हा, कोको गॉफ, साबालेन्का, सित्सिपस, सिनर, कार्लोस अल्कारेझ यांची आगेकूच वृत्तसंस्था/ मेलबर्न माजी चॅम्पियन कॅरोलिन वोझ्नियाकी, सहावी मानांकित ऑन्स जेबॉर यांना ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पात्रता फेरीतून आलेल्या युवा खेळाडूंकडून पराभवाचा धक्का बसला. मारिया टिमोफीव्हा, 16 वर्षीय मिरा अँड्रीव्हा यांच्यासह कार्लोस अल्कारेझ, यानिक सिनर, स्टेफानोस सित्सिपस, आर्यना साबालेन्का व कोको गॉफ यांनी […]