प्रज्ज्वलसारख्या व्यक्तीला पाठीशी घालणे अयोग्य-

प्रज्ज्वलसारख्या व्यक्तीला पाठीशी घालणे अयोग्य-

पंतप्रधानांचे वक्तव्य : कर्नाटक सरकारवरही आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रज्ज्वल रेवण्णासारख्या व्यक्तीला अजिबात खपवून घेतले जाऊ नये, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना केले आहे. कर्नाटकातील अश्लील चित्रफीत प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य करताना पंतप्रधानांनी काँग्रेस सरकारवर निजदच्या खासदाराला देश सोडून जाण्याची परवानगी दिल्याचा आणि आक्षेपार्ह लैंगिक व्हिडिओ जारी केल्याचा आरोप केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने याप्रकरणी कारवाई करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात नुकतेच हजारो अश्लील चित्रफितेंशी संबंधित प्रकरण उजेडात आले आहे. हजारो चित्रफितींच्या माध्यमातून सदर व्हिडिओ निजद आणि काँग्रेस यांच्यात युती असल्यापासूनचे असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस-निजद सत्तेत असतानाचे हे व्हिडिओ असून वक्कलिग समुदायाचे प्राबल्य असलेल्या भागात मतदान संपल्यानंतर ते जारी करण्यात आले. हे सर्व कारस्थान अत्यंत संशयास्पद असून प्रज्ज्वल रेवण्णा यांनी देश सोडल्यानंतर व्हिडिओ जारी करण्यात आले. राज्य सरकारला या प्रकरणाची कल्पना आली होती तर त्यांनी त्यावर लक्ष ठेवून प्रज्ज्वल यांचा विदेश दौरा रोखायला हवा होता, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच या मुद्यावरून आता राजकारण सुरू झाले असले तरी अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाऊ नये. आपल्या देशात असे उपद्व्याप बंद झाले पाहिजेत, असेही ते पुढे म्हणाले.