संशय का मनी आला…
विराज आणि विशाखा यांच्यामध्ये अलीकडे सतत भांडणे होतात. सहा वर्षांपूर्वी घरच्यांचा विरोध पत्करुन आपल्या भूमिकेवर ठाम रहात त्यांनी विवाह केला. दोघेही उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थही!! त्यांना एक चार वर्षांची गोड मुलगी आहे. दोन वर्षांपूर्वी विराजला बढती मिळाली आणि त्याचे दौरे वाढू लागले. काही वेळा विराज उशीरा घरी परतू लागला. अनेकदा त्याला बाहेर पार्ट्यांना जावे लागे. त्याला स्त्राr सहकाऱ्याबरोबर काम करावे लागे. त्यांच्या काही समस्याही त्याला सोडवाव्या लागत. त्याची जबाबदारीच अशी होती की त्याला आपल्या साऱ्या सहकाऱ्यांशी संपर्क ठेवावा लागायचा. इथूनच खरी समस्या सुरु झाली.
विराजचे मित्रही खूप होते. तेही अनेकदा कामानिमित्त घरी येत असत. परंतु कुणी महिला सहकारी घरी आली की विशाखाला अस्वस्थ वाटू लागे. विशाखाला वाटे की विराज हल्ली फार बदलला आहे. पूर्वीसारखा तो आपल्याकडे लक्ष देत नाही. फोन करत नाही वगैरे वगैरे…वरकरणी विशाखाचे म्हणणे खरे वाटत असले तरी जेव्हा सविस्तर चर्चा झाली तेव्हा अनेक गोष्टी उलगडू लागल्या.
विशाखा कुणी पुरुष सहकारी घरी आले तर हसून, समाधानाने आदरातिथ्य करत असे. विराज तिला चर्चेमध्ये सहभागी करुन घेत असे आणि ती सुद्धा सहभागी होत असे. परंतु महिला सहकारी आली आणि विराजने परिचय करुन द्यायचा प्रयत्न केला तर विशाखाच्या कपाळावर आठ्या उमटत असत. त्यातून एखादीच्या कामाची पद्धत चांगली असावी आणि विराजने मोकळेपणाने विशाखाला सहजतेने सांगावे तर ही खूप त्रागा करु लागे. कुणाही महिला सहकाऱ्याचा विषय तिला कमालीचा अस्वस्थ करे. विशाखाचे हे वागणे लक्षात आल्यावर विराज शांत राहु लागला. विराजला वाटे की विशाखावर आपले जिवापाड प्रेम असताना हिने असे का वागावे? इतका कुणाचा द्वेष का करावा? ऑफिसमध्ये काम करताना पुरुष सहकाऱ्याप्रमाणे स्त्राrयाही असणारच. मी जर विशाखाला उगीच कुणावरुन काही बोललो तर चालेल का? ती ऐकुन घेईल का? आणि हे योग्य आहे का? हे त्याचे प्रश्न होते. मी सतत तिच्या सहवासात असावे असे तिला वाटते. पण कामाच्या व्यापात हे खरेच शक्य आहे का…सततच चिडचिड संशय याचा कंटाळा येतो असे त्याचे म्हणणे होते.
विशाखा आणि विराज सारखी अनेक जोडपी ‘संशय’ या विकृतीला बळी पडतात. हा संशय त्यांच्या नात्यापुरता मर्यादित राहतो. एरवी इतरांशी ही माणसे चांगली वागताना दिसतात.
या व्यक्ती कितीही बुद्धिमान, यशस्वी असल्या तरी या बाबतीत अगदीच विचित्र वागतात. पहा हं..विराजने विशाखाकडे लक्ष द्यावे ही तिची अपेक्षा होती. बरं विराज ही तिच्यासाठी अनेक गोष्टी मनापासून करत होता. मग जो वेळ दोघांना एकत्र मिळतो तो त्यांनी छान घालवावा की नाही? परंतु विराजला पाहताच विशाखाचा राग उफाळून येई. मग सतत भूणभूण, विनाकारण तक्रारी, चिडचिड आणि त्याने काही समजवायचा प्रयत्न केला तरी पंचाईत…तू असंच सांगतोस म्हणून टिकेला सुरुवात व्हायची.
मॅडम..घरात सतत उद्वीग्न वातावरण, चिडचिड मग अशा वातावरणात घरी लवकर येऊन काय करु तुम्हीच सांगा..विराजचा प्रश्न रास्त होता. संशय डोक्यात शिरला की गोंधळ असा होतो की संशयी व्यक्ती आपल्या जोडीदाराला फक्त स्वत:साठीच राखून ठेवू पाहते आणि यातूनच सतत भांडणे उद्भवत राहतात. संशयकल्लोळाचे वादळ शमण्याऐवजी अधिकच वेग घेत वेगवेगळ्या दिशेने सरकत राहते.
पहा हं, त्या दिवशी शाम माझ्याकडे आला तो अस्वस्थतेचे कारण घेऊन. एका मुलीने प्रेमाचे नाटक करुन त्याला फसविले असे त्याचे म्हणणे होते. कुठल्याही तरुणीशी परिचय झाला आणि जरा चांगली मैत्री झाली की तो हक्क गाजवू लागे. मग ती कुठे गेली होती? का गेली होती? उशीरच का झाला असे प्रश्न विचारुन तिला भंडावून सोडी. त्याच्या या स्वभावामुळे संपर्कात येणाऱ्या मुली कंटाळून लांब राहणेच पसंत करत. त्याची कोणत्याही मुलीशी मैत्री टिकत नसे आणि मग मुलींची समस्त जातच फसवी असे लेबल लावून तो मोकळा होत असे.
आपण चुकतोय ही जाणीव संशयी व्यक्तीला क्वचितच होते. अशावेळी ते क्षमा मागतीलही परंतु पुन्हा ये रे माझ्या मागल्या हे चक्र सुरुच राहते. अगदी कमी वेळा असे होते की आपला संशय अनाठायी आहे हे मान्य करायला संशयी व्यक्ती तयार होते.
स्त्राr असो वा पुरुष संशयाचा चष्मा लागला आणि वेळीच त्यातून बाहेर पडले नाही तर संशयकल्लोळ अटळ आहे. स्त्राr पुरुष कुणीही असो परंतु वेळ पाहुन संशयी स्वभावाबद्दल बोलायला हवे, परंतु थोडे जपून.. खरंतर ही कसरत आहे. कुणालाही आपल्या वैगुण्याबद्दल चर्चा करायला आवडत नाही. संशयी व्यक्तीला तर आणिच संशय येतो. चर्चेतून चांगले निष्पन्न होण्याऐवजी टोकाचे मतभेद होऊ शकतात.
त्यामुळे जोडप्यातील एकाने डोके शांत ठेवत समजूतीचा स्वर ठेवायला हवा. या मनस्तापासाठी आपण दोघे मिळून काही करु ही भावना चर्चेतून व्यक्त होऊ द्या. एकमेकांवर आरोप करण्याऐवजी तिच्या किंवा त्याच्या मनाला जो त्रास होतोय त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. दोघांच्या सुखामध्ये शत्रु म्हणून उभ्या ठाकलेल्या ‘संशयावर’ आपण मात करणार आहोत हे हळुवारपणे जोडीदाराला पटवून द्या. त्यासाठी योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन, समुपदेशन घ्यायला हवे. गरज पडली तर औषध उपचाराने त्यावर मात करण्याची तयारी ठेवायला हवी. विकृत संशयाच्या भ्रमातून हजारो संसार उद्धवस्त होतात. काही वेळा अगदी आत्महत्या, खून इथपर्यंत मजल जाते. आपण अशा अनेक बातम्या वाचतो,
पाहतो.
पती, पत्नी असो वा प्रियकर प्रेयसी. दोघांपैकी कुणीही एकमेकांवर तो वा ती आपल्याशी एकनिष्ठ नाही, व्यभिचारी आहे असे वारंवार आरोप करणे, त्याच्या वा तिच्या प्रत्येक हालचालीबद्दल संशय घेणे ही एक मनोविकृतीच आहे. या मनोविकृतीला
‘पॅरेनॉईड जेलसी’ वा ‘विकृत संशयाचा भ्रम’ म्हटले जाते. ‘डिल्यूजन डिसऑर्डस्’ मध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या भ्रमातील हा एक भ्रम आहे. एवढा भ्रम सोडला तर या लोकांच्या वागण्यात गैर काही दिसत नाही. त्यामुळे या व्यक्ती आपल्या पत्नीचा वा पतीचा इतका छळ करत असेल याची इतरांना कल्पनाही येत नाही. या लोकांना इलाजासाठी राजी करणे हे ही महाकठीण असते. परंतु यावर योग्य इलाज झाल्यास ही समस्या दूर होऊ शकते. ही समस्या लक्षात येणे आणि ती समस्या सोडविण्याच्या दृष्टीने योग्य प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरंच या संशयकल्लोळातून बाहेर पडता येईल हे मात्र खरे!!
अॅड. सुमेधा संजिव देसाई
Home महत्वाची बातमी संशय का मनी आला…
संशय का मनी आला…
विराज आणि विशाखा यांच्यामध्ये अलीकडे सतत भांडणे होतात. सहा वर्षांपूर्वी घरच्यांचा विरोध पत्करुन आपल्या भूमिकेवर ठाम रहात त्यांनी विवाह केला. दोघेही उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थही!! त्यांना एक चार वर्षांची गोड मुलगी आहे. दोन वर्षांपूर्वी विराजला बढती मिळाली आणि त्याचे दौरे वाढू लागले. काही वेळा विराज उशीरा घरी परतू लागला. अनेकदा त्याला बाहेर पार्ट्यांना जावे लागे. त्याला […]