पालकमंत्र्यांकडून खानापूर तालुक्याचा पाहणी दौरा
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कुसमळी येथील बेळगाव-गोवा महामार्गावरील पुलासह हलात्री पुलाची केली पाहणी
खानापूर : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यात अनेक रस्त्यांची तसेच नदीवरील पुलांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. याची पाहणी करण्यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी खानापूर तालुक्यात पाहणी दौरा केला. यात त्यांनी कुसमळी येथील बेळगाव-गोवा महामार्गावरील पुलाची तसेच खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पुलाची पाहणी केली. त्यानंतर विश्रामधामात बैठक घेऊन तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, जि. पं. चे कार्यदर्शी राहुल शिंदे यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
दुपारी 1.30 वाजता पालकमंत्र्यांनी खानापूर-जांबोटी मार्गे कुसमळी पुलावर जावून पुलाची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पुलाच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करून वाहतूक बंद करण्याबाबत घेतलेला निर्णय योग्य असल्याचे जाहीर करून पावसाळा संपल्यानंतर या पुलाची नव्याने उभारणी केल्यानंतरच या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले. यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी विश्रामधामात अधिकाऱ्यांबरोबर जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
आमगावसह इतर दुर्गम गावांचे स्थलांतर करण्यासाठी नियोजन
तालुक्यातील दुर्गम आणि सुविधांपासून वंचित असलेल्या गावांचे स्थलांतर करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी बेंगळूर येथे चार दिवसांपूर्वी वनमंत्री खांड्रे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याबरोबर बैठक झाली असून नुकताच घडलेल्या हर्षदा घाडी प्रकरणामुळे दुर्गम भागातील खेड्यांचे स्थलांतर करून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी विश्रामधामात आमगाव ग्रामस्थांनी पालकमंत्री जारकीहोळी यांची भेट घेऊन आमगावचे तातडीने स्थलांतर करावे, अशा मागणीचे निवेदन दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी शासनाचा निर्णय झाला असून जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकारी पावसाळा संपल्यानंतर आमगाव येथे भेट देऊन रितसर स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियोजन करतील, असे सांगितले. तसेच भीमगड वनविभागातील गावांसह इतर दुर्गम भागातील खेड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून याबाबत पावसाळा संपल्यानंतर टप्प्याटप्प्याने स्थलांतराचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगितले.
कौलापूरवाडा पोल्ट्रीबाबत सोमवारी जिल्हाधिकारी निर्णय घेणार
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी कौलापूरवाडावासियांनी पालकमंत्र्यांना भेटून कौलापूरवाड्याला लागून असलेल्या पोल्ट्री फॉर्मबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. या पोल्ट्रीमुळे कौलापूरवाडावासियांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासाठी एक तर गावचे स्थलांतर करावे अन्यथा येथील पोल्ट्री बंद करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्याशी चर्चा करून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना या पोल्ट्रीची पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले. यामुळे कौलापूरवाडावासियांनी सोमवारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
हिरेहट्टीहोळी येथील समस्या दूर करा
यावेळी हिरेहट्टीहोळी येथील नागरिकांनी भेट घेऊन नदीच्या पुरामुळे दरवर्षी हिरेहट्टीहोळी येथील अनेक कुटुंबांना मलप्रभेच्या पुराच्या पाण्यामुळे अनेकांना तात्पुरता स्थलांतर करावे लागत आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हिरेहट्टीहोळी येथील नागरिकांच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊन आम्हाला या समस्येतून कायमचे मुक्त करावे, अशी मागणी केली. याप्रसंगी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, वकील संघटनचे अध्यक्ष अॅड. आय. आर. घाडी, सुरेश जाधव, नगरसेवक तोहीद चादकन्नावर, सावित्री मादार, सखुबाई पाटील, अनिता दंडगोल, दीपा पाटील, दीपक कवठणर, ईश्वर बोबाटे, अरुण बेळगावकर, वाशीम हट्टीहोळी, चंब्बाण्णा होसमणी यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आमगाव, कौलापूरवाडा, हट्टीहोळी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी पालकमंत्र्यांकडून खानापूर तालुक्याचा पाहणी दौरा
पालकमंत्र्यांकडून खानापूर तालुक्याचा पाहणी दौरा
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कुसमळी येथील बेळगाव-गोवा महामार्गावरील पुलासह हलात्री पुलाची केली पाहणी खानापूर : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यात अनेक रस्त्यांची तसेच नदीवरील पुलांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. याची पाहणी करण्यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी खानापूर तालुक्यात पाहणी दौरा केला. यात त्यांनी कुसमळी येथील बेळगाव-गोवा महामार्गावरील पुलाची तसेच खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पुलाची पाहणी केली. त्यानंतर विश्रामधामात बैठक घेऊन […]