वनडे मालिकेत भारताची विजयी सलामी

दक्षिण आफ्रिकेचा 143 धावांनी पराभव, मानधनाचे शतक वृत्तसंस्था/ बेंगळूर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्यो पहिल्या सामन्यात यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचे 143 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 266 धावांचे आव्हान दिले. उपकर्णधार स्मृती मानधनाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने 50 षटकात […]

वनडे मालिकेत भारताची विजयी सलामी

दक्षिण आफ्रिकेचा 143 धावांनी पराभव, मानधनाचे शतक
वृत्तसंस्था/ बेंगळूर
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्यो पहिल्या सामन्यात यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचे 143 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 266 धावांचे आव्हान दिले. उपकर्णधार स्मृती मानधनाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने 50 षटकात 8 बाद 265 धावा जमविल्या. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव 37.4 षटकात 122 धावांत आटोपला.
या पहिल्या सामन्यात यजमान भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या क्लासने शेफाली वर्माला 7 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर मलाबाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या हेमलताला तंबूचा रस्ता दाखविला. हेमलताने 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डर्कसेनने कर्णधार हरमनप्रीत कौरला झेलबाद केले. तिने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. शेनगेसीने जेमीमा रॉड्रिग्जला कॅपकरवी झेलबाद केले. तिने 28 चेंडूत 1 चौकारासह 17 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या खाकाने रिचा घोषला 3 धावांवर झेलबाद केले. भारताची यावेळी स्थिती 21.5 षटकात 5 बाद 99 अशी केविलवाणी झाली होती.
स्मृती मानधना आणि दिप्ती शर्मा यांनी संघाचा डाव सावरताना सहाव्या गड्यासाठी 81 धावांची भागिदारी केली. दिप्ती शर्माने शेनगेसीच्या गोलंदाजीवर स्वीपचे 3 चौकार ठोकले. पण त्यानंतर खाकाच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात दिप्तीचा त्रिफळा उडाला. तिने 48 चेंडूत 3 चौकारांसह 37 धावा जमविल्या. स्मृती मानधनाने क्लासच्या गोलंदाजीवर मिडऑनच्या दिशेने उत्तुंग षटकार खेचत 99 धावांवर झेप घेतली. तिने 93 चेंडूत 99 धावा जमविल्या. त्यानंतर मानधनाने क्लासच्या पुढील चेंडूवर एकेरी धावा घेत आपले शतक 116 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने झळकाविले. वनडे क्रिकेटमध्ये मानधनाचे हे सहावे शतक आहे. तिने 127 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 117 धावा जमविताना पूजा वस्त्रकर समवेत सातव्या गड्यासाठी 58 धावांची भागिदारी केली. 47 व्या षटकात क्लासने मानधनाला झेलबाद केले. पूजा वस्त्रकरने 42 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 31 धावा जमविल्या. भारताच्या डावात 17 अवांतर धावा मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे खाकाने 47 धावांत 3, क्लासने 51 धावांत 2 तर डर्कसेन, मलबा आणि शांगेसी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताच्या डावात 1 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. भारताने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 51 धावा जमविताना 2 गडी गमविले. भारताचे अर्धशतक 59 चेंडूत तर शतक 133 चेंडूत फलकावर लागले. मानधनाने आपले अर्धशतक 61 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने झळकाविले. मानधना आणि दिप्ती शर्मा यांनी अर्धशतकी भागिदारी 60 चेंडूत नोंदविले. भारताचे दीडशतक 192 चेंडूत, द्विशतक 249 चेंडूत तर 250 धावा 290 चेंडूत नोंदविल्या गेल्या. मानधना आणि पूजा वस्त्रकर यांनी अर्धशतकी भागिदारी 48 चेंडूत नोंदविली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. दक्षिण आफ्रिकेच्या केवळ 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. लूसने 58 चेंडूत 4 चौकारांसह 33, कॅपने 39 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 24 तर जेफ्टाने 30 चेंडूत 4 चौकारांसह 27 आणि ब्रिट्सने 3 चौकारांसह 18 धावा जमविल्या. भारतातर्फे आशा शोभना सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. शोभनाने 21 धावांत 4 तर दिप्ती शर्माने 10 धावांत 2 गडी बाद केले. रेणुकासिंग ठाकुर, पूजा वस्त्रकर, राधा यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 1 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 33 धावा जमविताना 2 गडी गमविले. दक्षिण आफ्रिकेचे अर्धशतक 97 चेंडूत तर शतक 189 चेंडूत नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक – भारत 8 बाद 265 (स्मृती मानधना 117, दिप्ती शर्मा 37, पूजा वस्त्रकर नाबाद 31, रॉड्रिग्ज 17, हेमलता 12, हरमनप्रीत कौर 10, अवांतर 17, खाका 3-47, क्लास 2-51, डर्कसेन, मलाबा आणि शांघेसी प्रत्येकी 1 बळी), दक्षिण आफ्रिका 37.4 षटकात सर्व बाद 122 (लूस 33, कॅप 24, जेफ्टा नाबाद 27, ब्रिट्स 18, आशा शोभना 4-21, दिप्ती शर्मा 2-10, रेणुकासिंग ठाकुर, वस्त्रकर, राधा यादव प्रत्येकी 1 बळी).