भारताचा पाकिस्तानवर रोमांचक विजय
सामनावीर जसप्रीत बुमराहचे 14 धावांत 3 बळी, अर्शदीप, सिराजचा भेदक मारा,
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारत-पाक लढतीला ‘मदर ऑफ ऑल बॅटल्स’ का म्हणतात, हे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. नासाऊ कौंटी स्टेडियमवरील ड्रॉप इन पिच, सूर्य आणि ढगांचा लपंडाव या सगळ्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान मोडून काढत भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत 6 धावांनी अफलातून विजय नोंदवला. प्रारंभी, पाकच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाचा डाव 119 धावांवर आटोपला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकला 7 बाद 113 धावांत रोखले. ऋषभ पंतने साकारलेली 42 धावांची खेळी, तीन भन्नाट झेल आणि जसप्रीत बुमराहने शिस्तबद्ध माऱ्यासह टिपलेले 3 विकेट्स या विजयाचे वैशिष्ट्या ठरले
. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे.
पावसाने व्यत्यय आणूनही भारत-पाकिस्तान सामना हा चाहत्यांसाठी पुन्हा एकदा मोठी पर्वणी ठरला. अवघ्या 119 धावांच्या लक्ष्याचा बचाव करत भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्ध रोमांचक विजय मिळवला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. जसप्रीत बुमराह, सिराज व अर्शदीप यांनी शानदार गोलंदाजी करताना पाकवर दबाव ठेवला. पाककडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 31 धावा केल्या, इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पाकला 20 षटकांत 7 बाद 113 धावापर्यंत मजल मारता आली.
टीम इंडियाचा धमाकेदार विजय
प्रारंभी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय पाकच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर पहिल्यांदा फलंदाजी करणं आव्हानात्मक असल्याचं यापूर्वीच्या मॅचमध्ये समोर आलं होतं. न्यूयॉर्कमधील या ग्राऊंडवरील खेळपट्टीवर बॉल उशिरानं बॅटवर येत होता. त्यामुळं भारताच्या फलंदाजांचा अंदाज चुकला. प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब झाली. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर सर्वकाही अपयशी ठरले. शेवटच्या षटकात शेपटीच्या फलंदाजांच्या काही धावांमुळे भारताला 119 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीच्या सामन्यात अपयशी ठरलेला विराट या सामन्यातही स्वस्तात बाद झाला. त्याला 4 धावांवर नसीम शाहने बाद केले. कर्णधार रोहित शर्माही 12 चेंडूत 13 धावा करुन बाद झाला.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर अक्षर पटेलला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले. अक्षर पटेल आणि रिषभ पंतने भारताचा डाव सावरला. अक्षर पटेलनं 20 धावा केल्या. पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो बाद झाला. स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव या सामन्यातही अपयशी ठरला. तो केवळ 7 धावा करुन तंबूत परतला. यानंतर भारताच्या विकेट जाण्याची मालिका सुरु झाली. शिवम दुबे देखील मोठी खेळी करु शकला नाही. रिषभ पंतने सर्वाधिक 6 चौकारासह 42 धावा केल्या. पंत मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अमीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना खातेही उघडता आले नाही. अर्शदीप सिंग 9 धावा करून धावबाद झाला. सिराज 7 धावा करून नाबाद राहिला. हार्दिक पंड्याला सात धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत सर्वबाद 119 (रोहित शर्मा 13, विराट कोहली 4, रिषभ पंत 31 चेंडूत 42, अक्षर पटेल 20, हार्दिक पंड्या 7, सिराज नाबाद 7, नसीम शाह व हॅरिस रौफ प्रत्येकी तीन बळी, मोहम्मद आमीर दोन बळी).
पाकिस्तान 20 षटकांत 7 बाद 113 (मोहम्मद रिझवान 31, बाबर आझम 13, उस्मान खान 13, इमाद वासीम 15, नसीम शाह नाबाद 10, जसप्रीत बुमराह 14 धावांत 3 बळी, हार्दिक पंड्या 2 तर अर्शदीप सिंग व अक्षर पटेल प्रत्येकी एक बळी).
Home महत्वाची बातमी भारताचा पाकिस्तानवर रोमांचक विजय
भारताचा पाकिस्तानवर रोमांचक विजय
सामनावीर जसप्रीत बुमराहचे 14 धावांत 3 बळी, अर्शदीप, सिराजचा भेदक मारा, वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क भारत-पाक लढतीला ‘मदर ऑफ ऑल बॅटल्स’ का म्हणतात, हे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. नासाऊ कौंटी स्टेडियमवरील ड्रॉप इन पिच, सूर्य आणि ढगांचा लपंडाव या सगळ्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान मोडून काढत भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत 6 धावांनी अफलातून विजय नोंदवला. […]