पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताचं आजवरचं सर्वात मोठं पथक, महाराष्ट्राच्या या खेळाडूंवर नजर
ऑलिंपिकनंतर पॅरिसमध्ये आता पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन होत आहे.
भारतानं यावेळी 84 खेळाडूंचं पथक पाठवलं असून, आजवरचं पॅरालिंपिकमधलं भारताचं हे सर्वात मोठं पथक आहे.
पॅरिसमध्ये भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव पॅरालिंपिकच्या उदघाटन सोहळ्यात ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचं नेतृत्व करतील.
पॅरालिंपिकसाठीच्या भारतीय पथकात भाग्यश्री जाधव, सुयश जाधव, सुकांत कदम, दिलीप गावित, ज्योती गडेरिया, स्वरूप उन्हाळकर या महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही समावेश आहे.
180 हून अधिक देशांच्या टीम्स या पॅरालिंपिकमध्ये खेळणार असून भारत 12 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होईल.
त्यात पॅरा सायकलिंग, पॅरा रोईंग, ब्लाईंड ज्युडो या तीन नव्या क्रीडाप्रकारांतही भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत.
याआधी टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारतानं 54 खेळाडूंचं पथक पाठवलं होतं आणि एकूण 19 पदकं कमावली होती. त्यात 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश होता.
2021 साली भरवण्यात आलेल्या त्या स्पर्धेत अनेक देश कोव्हिडमुळे त्या स्पर्धेत सहभागी झाले नव्हते. पण त्या स्पर्धेत पदकं मिळवणारे बहुतांश भारतीय खेळाडू यावेळीही विजेतेपदाचे प्रमुख दावेदार आहेत.
अवनी लेखरा भारताची स्टार
टोकियो पॅरालिंपिकमध्ये अवनी लेखरानं विश्वविक्रमाची बरोबरी करत सुवर्णपदक पटकावलं होतं. 10 मीटर एयर रायफल नेमबाजीत अवनीनं सुवर्णपदक पटकावलं होतं.
पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी अवनी ही भारताची पहिली महिला नेमबाज ठरली होती.
अवनीला 2021 सालच्या बीबीसी इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द ईयर पुरस्कारासाठी नामांकनं मिळालं होतं.
वयाच्या दहाव्या वर्षी अवनीला एक अपघात झाला होता. तेव्हापासून ती व्हीलचेअरवर आयुष्य जगते आहे.
पॅराशूटिंगनं अवनीला एक नवं जीवन दिलं. पण ती जिथे सरावासाठी जायची त्या शूटिंग रेंजवर आधी विकलांग खेळाडूंसाठी रँपही नव्हता. अवनीनंच तो बनवून घेतला.
पॅरा शूटर्ससाठी लागणारी खास उपकरणं कुठून आणायची हेही आधी तिच्या आईवडिलांना माहिती नव्हतं. पण अडचणींवर मात करत तिनं इतिहास घडवला.
सुमित, भाग्यश्री भारताचे ध्वजवाहक
टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्रानं जॅवलिन थ्रो म्हणजे भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलं होतं. तर टोकियो पॅरालिंपिकमध्ये सुमित अंतिलनं याच क्रीडाप्रकारात सुवर्णकमाई केली हीत.
सुमितनं तेव्हा 68.55 मीटरवर भालाफेक केली होती. आता पॅरीसमध्ये सुमित आपलं विजेतेपद कायम राखण्याच्या इराद्यानं खेळायला उतरेल.
25 वर्षीय सुमितनं याआधी दोनदा विश्वविजेतेपद मिळवलं होतं तसंच विश्वविक्रमही आपल्या नावे केला होता.
सुमितसोबतच नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातली भाग्यश्री जाधव हिची यंदा पॅरालिंपिकमध्ये भारताची ध्वजवाहक म्हणून निवड झाली आहे.
भाग्यश्रीनं 2023 साली झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये एफ 34 श्रेणीत महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं.
मे महिन्यात पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही तिनं रौप्यपदकाची कमाई केली. टोकियो ऑलिंपिकमध्ये भाग्यश्रीला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं, पण यावेळी पदक जिंकण्याची आणखी एक संधी तिच्याकडे आहे.
अगदी तरूण वयात विषप्रयोगानंतर आलेलं अपंगत्व, वैयक्तिक आयुष्यातली आव्हानं यांचा सामना करत भाग्यश्रीनं पॅरालिंपिक कसं गाठलं, ती कहाणी इथे वाचा.
शीतल देवी नवी आशा
जम्मूमध्ये जन्मलेल्या शीतल देवीला जन्मापासूनच दोन्ही हात नाहीत. पण तिरंदाजीत तिनं नवी शिखरं गाठण्यापासून तिला कुणी रोखू शकलेलं नाही.
17 वर्षांच्या शीतलनं गेल्या वर्षी आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्णपदकं मिळवत ऐतिहासिक यश साजरं केलं.
आता शीतल पहिल्यांदाच पॅरालिंपिकमध्ये सहभागी होणार आहे आणि तिला तिरंदाजीत पदकाची प्रमुख दावेदारही मानलं जातंय.
आजवरच्या शीतलच्या वाटचालीविषयी इथे वाचा.
मानसी जोशी, कृष्णा नागरवर नजर
मानसी जोशी माजी विश्वविजेती बॅडमिंटनपटू आहे आणि भारताला तिच्याकडून पदकाच्या मोठ्या आशा आहेत.
मानसीनं आजवर वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली आहे तर एशियन पॅरा गेम्समध्ये तिच्या खात्यात एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं जमा आहेत.
पण आजवर मानसीला पॅरालिंपिकच्या पदकानं हुलकावणी दिली आहे. ती कमी भरून काढण्याच्या इच्छेनंच मानसी पॅरिसमध्ये खेळायला उतरेल.
दुसरीकडे, बॅडमिंटनमध्येच पुरुष एकेरीत कृष्णा नागरवरही सर्वांची नजर राहील. कृष्णा नागरनं टोकियो पॅरालिंपिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं सुवर्णपदक मिळवलं होतं.
यावेळीही कृष्णा पदकाचा प्रमुख दावेदार आहे.
तसंच, टोकियो पॅरालिंपिकमध्ये रौप्यपदक मिळवणारा बॅडमिंटनपटू सुहास यतिराजकडूनही यंदा पदकाची आशा आहे. सुहास 2007 च्या बॅचचा उत्तर प्रदेश कॅडरचा आयएएस अधिकारीही आहे.
सध्या जागतिक क्रमवारीत सुहास पहिल्या क्रमांकावर असून पॅरिस पॅरालिंपिकमध्ये तो पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीत सहभागी होईल.
महाराष्ट्राच्या या खेळाडूंवर नजर
सुकांत कदम
पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदम सध्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
दहा वर्षांचा असताना क्रिकेटच्या मैदानात झालेल्या एका दुखापतीनं सुकांतचं आयुष्य बदलून टाकलं. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला अपंगत्व आलं आणि दहा वर्षं तो खेळापासून दूर राहिला.
सुकांतनं मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजात असताना तो पॅरा-बॅडमिंटनकडे वळला. 2015 पासून तो पुण्यात निखिल कानेटकर बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षक म्हणूनही काम करतो आहे.
सुकांतनं आजवर पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चार आणि एशियन पॅरा गेम्समध्ये तीन पदकं मिळवली आहे. तो यंदा पहिल्यांदाच पॅरालिंपिकमध्ये खेळतो आहे.
सुयश जाधव
मूळचा सोलापूरच्या करमाळ्याचा सुयश पॅरा स्विमिंगमध्ये 50मीटर बटरफ्लाय S7 प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करेल.
लहान असताना वीजेचा धक्का बसल्यानं सुयशला दोन्ही हातांचे तळवे आणि मनगटं गमवावी लागली होती.
2018 साली जकार्तामध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये सुयशनं एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली होती.
दिलीप गावित
धावपटू दिलीप गावितनं एशियन पॅरा गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवलं होतं. पॅरिसमध्ये दिलीप 400 मीटर शर्यतीत धावणार आहे.
मूळचा नाशिकच्या सुरगण्यातला असलेल्या दिलीप गावितला उजवा हात गमवावा लागला होता.
ज्योती गडेरिया
ज्योती गडेरिया भंडाऱ्यातल्या डोंगरगावची आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेली ज्योती आधी कबड्डी खेळायची. 2016 साली एका अपघातानंतर तिला डावा पाय गमवावा लागला.
त्यानंतर ती पॅरा सायकलिंगकडे वळली. पॅरिस पॅरालिंपिकमध्ये ज्योती सायकलिंगमध्ये महिलांच्या C2 गटात खेळेल.
स्वरूप उन्हाळकर
कोल्हापूरचा स्वरूप उन्हाळकर नेमबाज आहे आणि तो पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात खेळतो.
लहान असताना पोलियोमुळे स्वरुपच्या दोन्ही पायांतली ताकद गेली. तो पुन्हा स्वतंत्रपणे आयुष्य कधी जगू शकेल की नाही अशी त्याच्या कुटुंबियांनाही खात्री नव्हती. पण स्वरूपनं नेमबाजीत जागतिक पातळीवर झेप घेतली.
टोकियो पॅरालिंपिकमध्ये स्वरूपनं फायनल गाठली होती. पण अवघ्या 0.3 गुणांनी त्याचं पदक हुकलं होतं. आता पॅरिसमध्ये स्वरूपला पदकासाठी प्रमुख दावेदार मानलं जातंय.
पॅरालिंपिकमध्ये भारताची कामगिरी
1972 साली मुरलीकांत पेटकर यांनी हायडेलबर्गमध्ये झालेल्या पॅरालिंपिकमध्ये 50 मीटर फ्रीस्टाईल जलतरणात सुवर्णपदक मिळवलं होतं. पॅरालिंपिकच्या इतिहासात भारताचं ते पहिलं पदक होतं.
त्यानंतर पुढच्या 28 वर्षांत भारताला एकूण बाराच पदकं मिळवता आली.
2016 साली रियो पॅरालिंपिकमध्ये भारतानं दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य जिंकलं होतं. मग 2021 साली झालेल्या त्या क्रीडास्पर्धेत भारतानं एकूण 19 पदकं मिळवली.
टोकियोमध्ये भारतानं पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकं मिळवली होती. तसंच पदक तालिकेत 24 वं स्थान गाठलं होतं.
त्यानंतर गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या एशियन पॅरा गेम्समध्येही भारतानं 111 पदकं मिळवली होती.
Published By- Dhanashri Naik