बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या बाजूची झुडुपे त्वरित हटवा

प्रवाशांतून मागणी : वाहनांना धोकादायक : वाढलेल्या झुडुपांमुळे अनेकवेळा अपघात खानापूर : बेळगाव-चोर्ला-गोवा मार्गावर वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि झुडुपांमुळे वाहनांचा प्रवास धोकादायक बनला आहे. वाढलेल्या झुडुपांमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने अनेकवेळा अपघात घडत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची कुंपणे काढून रस्ता प्रवासासाठी सुलभ करणे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम आहे. मात्र वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे ही झुडपे हटवण्यास आडकाठी  करत असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून […]

बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या बाजूची झुडुपे त्वरित हटवा

प्रवाशांतून मागणी : वाहनांना धोकादायक : वाढलेल्या झुडुपांमुळे अनेकवेळा अपघात
खानापूर : बेळगाव-चोर्ला-गोवा मार्गावर वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि झुडुपांमुळे वाहनांचा प्रवास धोकादायक बनला आहे. वाढलेल्या झुडुपांमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने अनेकवेळा अपघात घडत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची कुंपणे काढून रस्ता प्रवासासाठी सुलभ करणे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम आहे. मात्र वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे ही झुडपे हटवण्यास आडकाठी  करत असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील प्रवास करणे धोकादायक बनले आहे. रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाढलेली झुडपे आणि फांद्या तातडीने काढून रस्ता सुलभ करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहेत.
बेळगाव व्हाया चोर्ला-गोवा हा रस्ता गोवा राज्यासाठी अत्यंत जवळचा असल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात प्रवासी तसेच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. गेल्या काही वर्षापासून वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे या रस्त्याच्या विकासाचे काम अडलेले होते. त्यामुळे या रस्त्याची डागडुजीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे हा रस्ता जागोजागी खड्डे पडून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. गेल्यावर्षी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्याच्या विकासाचे काम बाजूला सारुन आहे तो रस्ता सुस्थितीत करण्यासाठी निधी मंजूर केला होता. त्यामुळे बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस सुरळीत झाला असून या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात गोव्याला वाहतूक होत आहे. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल असल्याने मोठ्या झाडांच्या फांद्या तसेच कुंपणे वाढून रस्त्यावर आली आहेत.
वळणदार आणि घाट रस्ता 
हा संपूर्ण रस्ता वळणदार आणि घाट रस्ता असल्याने वाढलेल्या झुडुपांमुळे समोरील वाहन दिसून येत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत. यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या फांद्या  आणि कुंपणे हटवणे अत्यंत गरजेचे बनले आहे. मात्र वनखाते जाणीवपूर्वक दोन्ही बाजूच्या फांद्या आणि झुडपे हटवण्यास आडकाठी करत आहेत. वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे सध्या अस्तित्वात असलेला रस्ताच सुरळीत करण्यात आला आहे. याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या पट्ट्याच्या आत झुडुपे आणि फांद्या आल्याने वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. यासाठी तातडीने फांद्या आणि झुडुपे काढण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने झुडुपे काढण्यास हरकत नाही
संपूर्ण रस्त्याची पाहणी करून रस्त्यावर आलेल्या झुडुपे व फांद्या तोडण्यासाठी नियोजन केले जाईल, सार्वजनिक बांधकाम खात्याने झुडुपे मारण्यासाठी आमची हरकत नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडून झाडेच तोडली जातात. यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यक असलेल्या ठिकाणी झुडुपे आणि फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात येईल.
– वनाधिकारी सुनिता निंबरगी