हैदराबाद केवळ तेलंगणाची राजधानी

हैदराबाद केवळ तेलंगणाची राजधानी

लेक ह्यू’वर आता तेलंगणाचे नियंत्रण : आंध्रप्रदेशची राजधानी नसणार
वृत्तसंस्था/ हैदराबाद
देशातील मोठ्या महानगरांपैकी एक हैदराबाद रविवारपासून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशची संयुक्त राजधानी राहिलेले नाही. आंध्रप्रदेशला आता स्वत:ची नवी राजधानी शोधावी लागणार आहे. आंध्रप्रदेश पुनर्रचना अधिनियम, 2014 नुसार 2 जूनपासून हैदराबाद केवळ तेलंगणाची राजधानी असेल.
2014 मध्ये आंध्रप्रदेशच्या विभाजनावेळी हैदराबाद हे शहर 10 वर्षांसाठी तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दोन्ही राज्यांची राजधानी असेल असा निर्णय घेण्यात आला होता. 2 जून 2014 रोजी तेलंगणा हे राज्य अस्तित्वात आले होते. 10 वर्षांनी हैदराबाद केवळ तेलंगणाची राजधानी असेल आणि आंध्रप्रदेश राज्यासाठी एक नवी राजधानी असेल असे अधिनियमात म्हटले गेले होते.
फेब्रुवारी 2014 मध्ये संसदेत आंध्रप्रदेश पुनर्रचना विधेयक संमत झाल्यावर 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची स्थापना झाली होती. तेलंगणा राज्याच्या निर्मितीची मागणी अनेक दशकांपासून केली जात होती. तेलंगणाच्या निर्मितीसाठी हिंसक आंदोलनही झाले होते. या आंदोलनात अनेक जणांनी जीव गमावला होता. यातील कित्येकांनी तेलंगणाच्या निर्मितीसाठी स्वत:चे आयुष्य संपविले होते.
2 जूननंतर हैदराबादमधील शासकीय विश्रांतीगृह लेक ह्यू यासारख्या इमारती ताब्यात घ्या असा निर्देश तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रे•ाr यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. या इमारती 10 वर्षांच्या कालावधीसाठी आंध्रप्रदेशला सोपविण्यात आल्या होत्या. राज्याच्या विभाजनाच्या 10 वर्षांनंतरही आंध्रप्रदेश आणि तेलंगणादरम्यान संपत्तींच्या वाटपासारखे अनेक मुद्दे अद्याप निकाली निघालेले नाहीत. तेलंगणा सरकारने यासंबंधीच्या मुद्द्यांवरून मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यासाठीची अनुमती मागितली होती. परंतु निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी लागू असलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ही अनुमती नाकारली होती.