लाच स्वीकारताना आरोग्य निरीक्षक लोकायुक्तांच्या जाळ्यात

लाच स्वीकारताना आरोग्य निरीक्षक लोकायुक्तांच्या जाळ्यात बेळगाव : तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजू डुमगोळ यांचे साहाय्यक आरोग्य निरीक्षक शंभू चन्नण्णावर हा 30 हजाराची लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. यामुळे आरोग्य खात्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. कार्यालयातच लाच घेताना ही कारवाई लोकायुक्त पोलिसांनी केली आहे. यामुळे आरोग्य खात्याच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोकायुक्त पोलिसांकडून […]

लाच स्वीकारताना आरोग्य निरीक्षक लोकायुक्तांच्या जाळ्यात

लाच स्वीकारताना आरोग्य निरीक्षक लोकायुक्तांच्या जाळ्यात
बेळगाव : तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजू डुमगोळ यांचे साहाय्यक आरोग्य निरीक्षक शंभू चन्नण्णावर हा 30 हजाराची लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. यामुळे आरोग्य खात्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. कार्यालयातच लाच घेताना ही कारवाई लोकायुक्त पोलिसांनी केली आहे. यामुळे आरोग्य खात्याच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोकायुक्त पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेहरुनगर येथील श्री करडी आयुष थेअरपी क्लिनिकमध्ये तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजू डुमगोळ व त्यांचे साहाय्यक आरोग्य निरीक्षक शंभू चन्नण्णावर व इतर सहकाऱ्यांनी दि. 27 मे 2024 रोजी छापा टाकला होता. त्यावेळी क्लिनिकमध्ये काही त्रुटी दिसून आल्या होत्या. यावरून डॉ. विनायक करडी यांना सूचना देण्यात आली होती. यानंतर दि. 28 मे 2024 रोजी डॉ. विनायक करडी यांना फोनवरून संपर्क साधून तालुका आरोग्य कार्यालयात बोलावून नोटीस देण्याचे सांगण्यात आले. या कारवाईपासून सुटका व्हायची असेल तर 30 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. डॉ. संजू डुमगोळ यांचे साहाय्यक आरोग्य निरीक्षक शंभू चन्नण्णावर यांच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर करडी आयुष क्लिनिकचे डॉ. विनायक करडी यांनी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन लोकायुक्त पोलिसांनी दि. 4 जून रोजी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात साहाय्यक शंभू चन्नण्णावर कार्यालयातच लाच स्वीकारताना लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकला आहे. लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख हणमंत राय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरंजन पाटील व त्यांच्या सहाकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईमुळे आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली असून लाच स्वीकारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असलेल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाच स्वीकारली जात असल्याबद्दलची चर्चा सुरू आहे.