स्वत:चा जीव धोक्यात घालून बालकाचे वाचविले प्राण

स्वत:चा जीव धोक्यात घालून बालकाचे वाचविले प्राण

वार्ताहर /उचगाव
स्वत:चा जीव धोक्मयात घालून बालकाला खड्ड्यातून वाचविल्याची घटना तुरमुरीमध्ये नुकतीच घडली. तुरमुरी येथील यल्लाप्पा मल्लाप्पा बेळगुंदकर यांचा पाच वर्षाचा मुलगा घराजवळ खेळत असताना गोबर गॅसच्या खड्ड्यात पडला. यावेळी बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून जवळच बसलेल्या त्याच्या आईने खड्ड्याकडे धाव घेतली. बाळ खोल खड्ड्यात बुडत असलेले पाहून आईने आरडाओरड केली. त्यावेळी शिवाजी नागेंद्र बेळगुंदकर या युवकाने गोबर गॅसच्या खड्ड्यात उडी मारून त्या खड्ड्यातून बाळाला सुखरुप बाहेर काढले.
गोबर गॅसचा हा खड्डा जवळजवळ दहा फूट खोल आहे. बाळाला शिवाजीने त्याच्या आईकडे सुपूर्द केले, तेव्हा आईचा जीव भांड्यात पडला. काही क्षणाचा वेळ झाला असता तर बाळाला जीव गमवावा लागला असता. बाळाचा जीव वाचविल्यामुळे शिवाजी बेळगुंदकर यांचा गावकरी व पीटीएल क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी तुरमुरी ग्रा. पं. अध्यक्ष चंद्रकांत जाधव, बाळू तंगणकर, राजू खांडेकर, माजी सैनिक पुंडलिक खांडेकर, माऊती भक्तीकर, सुरेश खांडेकर, वामन मेघोचे, संदीप बेळगावकर, रामलिंग जाधव, प्रसाद जाधव व तऊण उपस्थित होते.