स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची चौकशी करू : आयुक्त दुडगुंटी

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची चौकशी करू : आयुक्त दुडगुंटी

मनपा मासिक तक्रार निवारण बैठकीत विविध विषयांवर चर्चा : पुन्हा लवकरच 134 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक
बेळगाव : मनपामध्ये आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या अध्यक्षतेखाली मासिक तक्रार निवारण बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वाचे ठराव पास करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून मासिक तक्रार निवारण बैठक घेण्यात आली नव्हती. सदर बैठक बुधवारी घेण्यात आली. या बैठकीमध्ये पी. के. क्वॉर्टर्स, स्वच्छता कर्मचारी भरती, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, पदोन्नती आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. 1973 नंतरच्या क्वॉर्टर्सची मालकी मिळविण्याबाबत तीन पर्याय निवडण्यात आले आहेत. बेंगळूर येथील नगरविकास खात्याला पत्र पाठविण्याबरोबरच संबंधित क्वॉर्टर्सची कागदपत्रे संकलन करण्यासाठी विशेष व्यक्तीची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर एमएस स्कॅव्हेंजरची संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 154 स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नेमणूक करूनही त्यांचे वेतन थकविण्यात आले आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली. आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी याबाबत आपण जातीने लक्ष घालून चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी नेमणूक करण्याची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा लवकरच 134 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. व्यायाम शाळेचे आणि लायब्ररीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी क्रिया योजना तयार करण्यावर चर्चा करण्यात आली. आनंदवाडी येथील वाल्मिकी भवनचे आदीजांबव समाजाकडे लवकरच हस्तांतर केले जाणार असून यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यावेळी एसीपी कट्टीमनी, सामाजिक सुरक्षा खात्याचे संचालक प्रवीण शिनरे, साहाय्यक आयुक्त उदयकुमार, कार्यकारी अभियंता कलादगी, सचिव विजय निरगट्टी, मुनिस्वामी भंडारी आदी उपस्थित होते.