टी-20 मानांकनात हरमनप्रीत, रिचा घोषला बढती

वृत्तसंस्था/ दुबई आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या महिलांच्या टी-20 मानांकनात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर, रिचा घोष यांना बढती मिळाली आहे. हरमनप्रीतने तीन स्थानांची प्रगती करीत 13 वे स्थान मिळविले आहे. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत तिने 105 धावा जमविल्या होत्या. रिचा घोषनेही दोन स्थानांची प्रगती केली असून ती आता 23 व्या स्थानावर पोहोचली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या […]

टी-20 मानांकनात हरमनप्रीत, रिचा घोषला बढती

वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या महिलांच्या टी-20 मानांकनात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर, रिचा घोष यांना बढती मिळाली आहे.
हरमनप्रीतने तीन स्थानांची प्रगती करीत 13 वे स्थान मिळविले आहे. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत तिने 105 धावा जमविल्या होत्या. रिचा घोषनेही दोन स्थानांची प्रगती केली असून ती आता 23 व्या स्थानावर पोहोचली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात तिने नाबाद 28 धावांची निर्णायक खेळी केली होती. राधा यादव तितास साधू यांनी गोलंदाजीच्या मानांकनात प्रगती केली आहे. राधाने सात स्थानांची झेप घेत 23 वे तर साधूने 18 स्थानांची झेप घेत 60 वे स्थान मिळविले आहे.
पाकविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंड महिला संघातील खेळाडूंचीही मानांकनात प्रगती झाली आहे. कर्णधार हीदर नाईटने चार स्थानांची प्रगती करीत 18 वे स्थान घेतले आहे. 37 धावांची खेळी करणाऱ्या व चार झेल पकडणाऱ्या अॅमी जोन्सने तीन स्थानांची बढती मिळवित 26 वे स्थान घेतले आहे. पाकविरुद्ध चार बळी टिपणाऱ्या सारा ग्लेनने दोन स्थानांची बढती घेत चौथे तर तिचीच सहकारी सोफी एक्लेस्टोनने तिसरे स्थान मिळविले आहे. लॉरेन बेलनेही चार स्थानांची झेप घेत सातवे स्थान पटकावले आहे.
वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत चांगले प्रदर्शन केल्यानंतर लंकन खेळाडूंच्या स्थानातही सुधारणा झाली आहे. टी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्यानंतर शतकवीर चमारी अटापटू दोन स्थानांची बढत घेत सातव्या स्थानावर पोहोचली आहे. अष्टपैलूंच्या यादीतही ती एका स्थानाने प्रगती करीत पाचवे स्थान घेतले आहे. गोलंदाजीत इनोशी फर्नांडो व उदेशिका प्रबोधनी या प्रत्येकीने पाच स्थानांची झेप घेत अनुक्रमे 19 व 30 वे स्थान घेतले आहे.