गुजरातचा चेन्नईवर दणदणीत विजय
विजयासह प्ले ऑफच्या आशाही कायम : सामनावीर शुभमन-सुदर्शनची शतके
शुभमन गिल व साई सुदर्शनची आक्रमक शतके व मोहित शर्मा, रशीद खान यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने चेन्नईचा 35 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 3 बाद 231 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला 196 धावापर्यंतच मजल मारता आली. या विजयासह गुजरातचे 12 सामन्यात 10 गुण झाले असून त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. दुसरीकडे पराभवानंतरही चेन्नईचा संघ 12 गुणासह चौथ्या स्थानी आहे.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 10 धावांत 3 विकेट गमावल्या. रहाणे व रचिन रवींद्रला 1 धाव करता आली. कर्णधार ऋतुराज गायकवाडला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर डॅरिल मिचेल व मोईन अली यांच्यात 109 धावांची भागीदारी झाली. मिचेलने 34 चेंडूत 63 तर मोईन अलीने 36 चेंडूत 56 धावा फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर चेन्नईचे इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. दुबेने 21 तर जडेजाने 18 धावा केल्या. धोनी 26 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईला 20 षटकांत 8 बाद 196 धावा करता आल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 तर रशीद खानने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
प्रारंभी, या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुभमन गिल व साई सुदर्शन यांनी शानदार सुरुवात केली. या दोघांनी चेन्नईची गोलंदाजी फोडून काढताना तुफानी फलंदाजी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 17 षटकात 210 धावांची विक्रमी भागीदारी केली. विशेष म्हणजे, आयपीएलमधील ही संयुक्त सर्वोच्च सलामी भागीदारी आहे. शुभमन व सुदर्शन यांनी शानदार शतके झळकावली, या शतकांच्या बळावर गुजरातने 20 षटकांत 3 बाद 231 धावांचा डोंगर उभा केला.
सुदर्शन, गिलची तुफानी शतके
साई सुदर्शनने शानदार फलंदाजी करताना 51 चेंडूत 103 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 7 षटकार मारले. साईचे हे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे. शतकानंतर तुषार देशपांडेने त्याला शिवम दुबेच्या हाती झेलबाद केले. दुसरीकडे, शुभमन गिलही उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्यानेही शानदार शतक झळकावले. गिलने 55 चेंडूत 104 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 6 षटकार मारले. आयपीएलच्या इतिहासातील हे शंभरावे शतक ठरले असून हा मान गिलला मिळाला.
यानंतर तुषार देशपांडेच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना गिल रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद झाला. गिलचे आयपीएलमधील हे चौथे शतक आहे. ही जोडी बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर 11 चेंडूत 16 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर शाहरुख खान दोन धावा करून धावबाद झाला. चेन्नईकडून तुषार देशपांडेने दोन बळी घेतले.
साई सुदर्शनची विक्रमी कामगिरी
चेन्नईविरुद्ध लढतीत साई सुदर्शनने 51 चेंडूत 103 धावांची खेळी खेळली. या दरम्यान, त्याने एक मोठा पराक्रम केला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू ठरला. या बाबतीत त्याने ऋतुराज गायकवाडसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. साई सुदर्शनने अवघ्या 25 डावांत ही कामगिरी केली. याआधी हे रेकॉर्ड सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाडच्या नावे होते, ज्यांनी 31 डावांमध्ये 1000 धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे भारतीय
साई सुदर्शन – 25 डाव
सचिन तेंडुलकर/ऋतुराज गायकवाड – 31 डाव
तिलक वर्मा – 33 डाव
सुरेश रैना/यशस्वी जैस्वाल – 34 डाव
आयपीएलमधील सर्वोच्च सलामी
शुक्रवारी चेन्नईविरुद्ध सामन्यात साई सुदर्शनने 103 तर शुभमन गिलने 104 धावा केल्या. या बरोबर सुदर्शनने शुभमन गिलसह पहिल्या विकेटसाठी विक्रमी 210 धावांची भागीदारी केली. ही आयपीएलमधील पहिल्या विकेटसाठी धावांची संयुक्त सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी 2022 मध्ये केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 210 धावा जोडल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स 20 षटकांत 3 बाद 231 (साई सुदर्शन 51 चेंडूत 5 चौकार व 7 षटकारासह 103, शुभमन गिल 55 चेंडूत 9 चौकार व 6 षटकारासह 104, डेव्हिड मिलर नाबाद 16, शाहरुख खान 2, तुषार देशपांडे 33 धावांत 2 बळी).
चेन्नई सुपर किंग्स 20 षटकात 8 बाद 196 (रहाणे 1, रचिन रविंद्र 1, ऋतुराज गायकवाड 0, डॅरिल मिचेल 63, मोईन अली 56, दुबे 21, जडेजा 18, धोनी नाबाद 26, मोहित शर्मा 3 तर रशीद खान 2 बळी, उमेश यादव, वॉरियर प्रत्येकी एक बळी).