‘गोकुळ’ दूध संघ सहकाराचा मानदंड! खासदार विशाल पाटील यांचे गौरवोद्गार

‘गोकुळ’ दूध संघ सहकाराचा मानदंड! खासदार विशाल पाटील यांचे गौरवोद्गार

गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयास भेट

कोल्हापूर प्रतिनिधी

देशाच्या कृषी क्षेत्रास दिशा देण्याचे काम सहकार क्षेत्राने केले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सहकार चळवळीचे योगदान मोठे आहे. गोकुळने सहकारातील मूल्यांची जपणूक करत दुग्ध व्यवसायातील दूध संकलन, दुधावरील प्रक्रिया व त्याचे वितरण याचे उत्कृष्ट नियोजन करून संस्थेला एकूणच नाव लौकिक प्राप्त करून दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सहकाराचा आदर्श म्हणून ओळखला जाणारा गोकुळ दूध संघ हा सहकाराचा मानदंड असल्याचे गौरवोद्गार सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील यांनी काढले.
गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयास सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भेट दिली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते खासदार पाटील यांचा सत्कार झाला. याप्रसंगी खासदार पाटील बोलत होते.
खासदार पाटील म्हणाले, गोकुळसारख्या शेतकरीभिमुख असणाऱ्या संस्थेस भेट देण्याचा योग आला. भविष्यात दुग्ध व्यवसायासंबंधी असणाऱ्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी केंद्रामध्ये पाठपुरावा करू असे आश्वासन खासदार पाटील यांनी दिले.
चेअरमन डोंगळे म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कृषी व दुग्ध व्यवसायाचा विकास साधला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात सहकाराची बीजे रोवली गेली. गोकुळच्या वाटचाली मध्ये वसंतदादांचे मोलाचे योगदान असल्याचे डोंगळे यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, रयत सेवा कृषी संघाचे चेअरमन सचिन पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे, शिवसेना संपर्क प्रमुख शाकीर पाटील, संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, डी.डी.पाटील आदी उपस्थित होते.