भगवंत देहत्यागासाठी सज्ज झाले

अध्याय तिसावा नाथमहाराज म्हणाले, यादवांना ब्रह्मशाप मिळाला होता. त्यामुळे त्यांच्यात छळ कपट होण्यास सुरवात झाली. आपल्या पालनकर्त्यावर चालून जाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. कृष्णमायेने त्यांच्या बुद्धीला सांगून सवरून ठकवले. मद्यपानाने उन्मत्त झालेले यादव श्रीकृष्ण आणि बलराम ह्याच्या क्रोधाग्नीत भस्म झाले. अशाप्रकारे स्वत:च्या कुलातील उन्मत्त झालेल्या सदस्यांचा समूळ नाश करून एक कर्तव्य पार पडल्याचे समाधान श्रीकृष्ण अनुभवत […]

भगवंत देहत्यागासाठी सज्ज झाले

अध्याय तिसावा
नाथमहाराज म्हणाले, यादवांना ब्रह्मशाप मिळाला होता. त्यामुळे त्यांच्यात छळ कपट होण्यास सुरवात झाली. आपल्या पालनकर्त्यावर चालून जाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. कृष्णमायेने त्यांच्या बुद्धीला सांगून सवरून ठकवले. मद्यपानाने उन्मत्त झालेले यादव श्रीकृष्ण आणि बलराम ह्याच्या क्रोधाग्नीत भस्म झाले. अशाप्रकारे स्वत:च्या कुलातील उन्मत्त झालेल्या सदस्यांचा समूळ नाश करून एक कर्तव्य पार पडल्याचे समाधान श्रीकृष्ण अनुभवत होते. श्रीकृष्णाने यादवकुलाचा आधी प्रतिपाळ केला, त्यांच्यावर अतोनात प्रेम केले आणि वेळ आल्यावर शेवटी त्यांचाच समूळ नाश करून स्वत: मायाममतेपासून अलिप्त असल्याचे दाखवून दिले. जो जाणता असतो, सज्ञान असतो त्याला स्त्राr, पुत्रांसह कुलाचा नाश होत असताना त्यांच्याबद्दल ममता उपजत नाही त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे वर्तन होते. सज्ञानी व्यक्तीप्रमाणे श्रीकृष्णानेही कुळातील कुणाबद्दलही मायाममतारुपी मोह न बाळगता स्वत:ची नित्यमुक्तता दाखवून दिली. हा सर्व प्रकार बघून बलरामांना अवतारकार्य संपल्याची जाणीव झाली. त्यानंतर बलरामांनी समुद्राच्या तीरावर योगासन घालून निर्वाणध्यान मांडले. देहातील प्राण आकर्षून घेतले, देहाभिमानाचा संपूर्ण त्याग केला आणि मग परमपुरुषाचे ध्यान करून त्याच्याशी तद्रूप झाले. ज्याप्रमाणे घटात आकाशरूपी पोकळी असते आणि तो फुटल्यावर ती पोकळी महदाकाशात मिसळून जाते त्याप्रमाणे देहाभिमान सोडून दिल्यावर बलराम परमेश्वरात विलीन झाला. बलरामाप्रमाणेच सर्वसामान्य माणसांच्यात असलेले आत्मस्वरूपही परमेश्वरात विलीन व्हायला उत्सुक असते परंतु मायेच्या आवरणामुळे ज्या देहात ते वास करत असते तो देह हेच माझे अस्तित्व आहे ह्या गैरसमजुतीमुळे त्याच्या मूळ स्वरूपाचा त्याला विसर पडलेला असतो. त्यामुळे होताहोइतो ह्या शरीराला काही होऊ नये आणि मला कधी मरण येऊ नये असेच त्याला वाटत असते परंतु सध्याचे शरीर थकले की, नाईलाजाने अपुऱ्या राहिलेल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी, तसेच पूर्वकर्माचे भोग भोगण्यासाठी त्याला नवीन देहात प्रवेश करावा लागतो परंतु बलरामांचे तसे नव्हते. त्यांच्या खऱ्या स्वरूपाची त्यांना विस्मृती झालेली नसल्याने मी म्हणजे हा देह ह्या कल्पनेचा आणि ह्या कल्पनेतून होणाऱ्या देहाभिमानाचा त्यांनी सहजी त्याग केला. अवतार कार्यातून आत्तापर्यंत सुरू असलेल्या मनुष्यनाट्याचा त्यांनी देहासकट त्याग केला आणि आपले मूळ रूप धारण केले. हे बलरामाचे निर्वाण पाहून आता आपली पाळी आली हे श्रीकृष्णाने ओळखले. बलराम जाणिवेच्या पलीकडे गेला हे पाहून सर्वसत्ताधीश देवकीसुत भगवान् श्रीकृष्णनाथांनीही नियतीच्या संकेताला मान्यता दिली. सगुण रुपात भगवंतांनाही प्रारब्धाचे नियम लागू होतात. त्याप्रमाणे ते देहत्याग करून निजधामाला जाण्यास सिद्ध झाले. त्यासाठी सकल सृष्टी धारण करणाऱ्या त्या धराधराने मौन होऊन अश्वत्थातळी वीरासन घातले आणि शार्ङ्गधर श्यामसुंदर स्थिर झाले. त्या स्वरूपाच्या आवडीने शिव, ब्रह्मदेव इत्यादि देवगण वेडे झाले,  त्या स्वरूपाच्या दर्शनाच्या गोडीने सृष्टी नादावली. भगवंतांच्या ह्या रुपाला पाहून लोकांचे डोळे निवले. डोळ्यांना दृष्टीसुख मिळाल्याचे पाहून इतर ज्ञानेंद्रिये कासावीस झाली. भगवंताच्या रूपाची आपल्यालाही मनसोक्त अनुभूती आली पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी रसनेने त्यांचे कीर्तन आरंभले. त्यातून तिला अतिसुरस अशा कीर्तनरसाची गोडी चाखायला मिळाली. ती गोडी इतकी प्रभावी होती की त्यामुळे विषयरस अगदीच बेचव झाला आणि त्यामुळे संसार निरस वाटू लागला. श्रीकृष्णकीर्ती कानांनी ऐकल्यावर तेही तृप्त झाले. त्यामुळे त्रिविध ताप शांत झाले. कीर्तनातून त्याच्या नामाची कीर्ती वर्णन केल्यावर चारही मुक्ती शरण आल्या.
क्रमश: