मार्कंडेयच्या पात्रात तरंगतोय कचरा

मार्कंडेयच्या पात्रात तरंगतोय कचरा

बंधाऱ्यात अडकलेत ओंडके, पुराचा धोका
बेळगाव : मागील दोन-चार दिवसापासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने मार्कंडेय दुथडी भरून वाहू लागली आहे. मात्र कंग्राळी खुर्द येथील जुना पूलवजा बंधाऱ्यावर कचरा साचून राहिला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडचणी येऊ लागल्या आहेत. परिणामी नदी काठावरील शेतीला पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्याबरोबर जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेयच्या पात्रात कचरा तरंगताना दिसत आहे. त्यामुळे मार्कंडेय पूलवजा बंधाऱ्याची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पावसाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नदी, नाले आणि जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.  मार्कंडेय नदीच्या पाणी पातळीत वाढ होत पाणी पात्राबाहेर पडले आहे. याचबरोबर आता नदीच्या पात्रात कचऱ्यांची समस्या गंभीर बनू लागली आहे. नदीकाठी प्लास्टिक, आणि इतर कचरा दिसून येत आहे. त्याबरोबर कंग्राळी खुर्द येथील जुना पूलवजा बंधाऱ्याजवळ वाहून आलेले लाकडाचे ओंडके, प्लास्टिक आणि इतर कचरा अडकून राहिला आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अडचणी येऊ लागल्या आहेत.
गतवर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे मार्कंडेय उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडी पडली होती. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी केरकचरा नदीपात्रात टाकला होता. तो आता नदीच्या पात्रात तरंगताना दिसून येत आहे. त्यामुळे नदीचे पाणीही प्रदूषित होऊ लागले आहे. विशेषत: बंधाऱ्याजवळ  कचरा साचून असल्याने पाण्याचा प्रवाह संथगतीने सुरु आहे. परिणामी नदीकाठावरील शिवारात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन आणि ग्रामपंचायत बंधाऱ्याजवळ साचलेला कचरा काढणार का? हे पहावे लागेल.