शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, सुप्रिया सुळेंसह 5 उमेदवार घोषित
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 30 मार्च लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिरुरमधून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आलीये.
अहमदनगरमधून नीलेश लंके यांच्या उमेदवारीची घोषणा केली गेली.
वर्ध्यामधून अमर काळे, तर दिंडोरीमधून भास्करराव बगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अहमदनगरमधील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी काल (29 मार्च) आमदारकीचा राजीनामा दिला होता.
अहमदनगरमधील पारनेरमध्ये निलेश लंके यांनी समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.
भाषणादरम्यान निलेश लंके म्हणाले की, “आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा. त्यासाठी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.”
आताच ईमेलद्वारे राजीनामा पाठवत आहे, असं सांगत निलेश लंकेंनी राजीनाम्याचं पत्र भर सभेत उपस्थितांना दाखवलं. शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण पुढे जायचं आहे. मधल्या काळात पवार साहेबांना आपण दु:ख दिलं, ते भरून काढायचं, असंही लंके यांनी यावेळी म्हटलं होतं. भाजपकडून अहमदनगरमधून याआधीच विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील
शिरुरमधून शरद पवार गटाने डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली आहे.त्यांची उमेदवारी जवळपास निश्चितच होती.
मोशी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या एका मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. अलीकडेच मंचरमध्ये झालेल्या सभेत कोल्हेंनी प्रचाराचे रणशिंग फुंकले होते.
दुसरीकडे महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे जाणार की अजित पवार गटाकडे यासंबंधी चर्चा सुरू होत्या. या जागेचा सस्पेन्स आता संपला आहे.
अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटात प्रवेश केला होता.
2019 च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.
Published BY- Priya Dixit