फिन अॅलनने उडवल्या पाकिस्तानच्या चिंधड्या

तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडचा पाकवर 45 धावांनी विजय : मालिकाही जिंकली वृत्तसंस्था/ ड्युनेडिन ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 224 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ संपूर्ण षटके खेळून केवळ […]

फिन अॅलनने उडवल्या पाकिस्तानच्या चिंधड्या

तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडचा पाकवर 45 धावांनी विजय : मालिकाही जिंकली
वृत्तसंस्था/ ड्युनेडिन
ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 224 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ संपूर्ण षटके खेळून केवळ 179 धावा करू शकला. 62 चेंडूत 5 चौकार व 16 षटकारासह 137 धावांची वादळी खेळी साकारणाऱ्या फिन अॅलनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. उभय संघातील चौथा सामना दि. 19 रोजी ख्राईस्टचर्च येथे होईल.
पाकिस्तानने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीची संधी दिली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे याचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो चौथ्या षटकात 7 धावा काढून हारिस रौफचा शिकार ठरला. यानंतर फलंदाजीला आलेल्या फिन अॅलनने सलग तिसऱ्या सामन्यात त्याने पाकचा कर्णधार शाहिन आफ्रिदी व हॅरिस रौफ यांना चांगलेच धुतले
अॅलनचे अवघ्या 48 चेंडूत शतक
सलामीवीर कॉनवे स्वस्तात बाद झाल्यानंतर अॅलन व टीम सेफर्ट यांनी दुसऱ्या गड्यासाठी दुसऱ्या गड्यासाठी 125 धावांची भागीदारी साकारली. सेफर्टने 23 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. मोहम्मद वासीमने 14 व्या षटकात त्याला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर फलंदाजीला आलेला डॅरिल मिचेल (8) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसरीकडे, फिन अॅलनने शानदार फलंदाजी करताना अवघ्या 48 चेंडूत शतक झळकावले. यासोबतच अॅलनने न्यूझीलंडसाठी टी 20 मध्ये सर्वोच्च धावसंख्या केली. त्याने अवघ्या 62 चेंडूंचा सामना करताना 137 धावा केल्या. अॅलनच्या या खेळीत 5 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता. झमान खानने त्याला बाद केले. झमान खानने त्याची ही वादळी खेळी संपुष्टात आणली. अॅलन बाद झाल्यानंतर फिलिप्सने 15 चेंडूत 19 धावा केल्या. कर्णधार सॅटनर 4, चॉपमनने 1 धावा केल्या. अॅलनच्या या शानदार खेळीच्या जोरावर किवीज संघाने 20 षटकांत 7 बाद 224 धावा केल्या. पाककडून हॅरिस रौफ सर्वात महागडा गोलंदाज ठरला. 60 धावा देत त्याने 2 बळी मिळवले. कर्णधार शाहिनने देखील 44 धावा देत 1 बळी घेतला. याशिवाय, झमान खान, नवाज व वासीम यांनी एकेक बळी मिळवला.
पाकची पराभवाची मालिका कायम
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकातच सलामीवीर सॅम अयुब 10 धावा करून बाद झाला. दुसरा सलामीवीर मोहम्मद रिझवान हाही फार काळ टिकला नाही आणि आठव्या षटकात तोही 24 धावा करून बाद झाला. फखर जमानने 10 चेंडूत 19 धावा केल्या आणि आझम खान 7 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, बाबर आझमने एका बाजूने सातत्य राखत काही उत्कृष्ट फटके मारले. त्याने मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावताना 37 चेंडूत 58 धावा केल्या. आझम बाद झाल्यानंतर अखेरच्या काही षटकांमध्ये मोहम्मद नवाजने 15 चेंडूत 28 धावा केल्या, तर कर्णधार शाहीन आफ्रिदी 16 धावांवर नाबाद राहिला पण तो आपल्या संघाला मोठ्या पराभवापासून वाचवू शकला नाही. पाकला 7 बाद 179 धावापर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडकडून साऊदीने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 7 बाद 224 (फिन अॅलन 137, सेफर्ट 31, फिलिप्स 19, हॅरिस रौफ 2 बळी)
पाकिस्तान 20 षटकांत 7 बाद 179 (बाबर आझम 58, मोहम्मद नवाज 28, मोहम्मद रिझवान 24, शाहिन आफ्रिदी नाबाद 16, टीम साऊदी दोन बळी)
अॅलनचा झंझावात, एकाच डावात तब्बल 16 षटकार
पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात किवीज सलामीवीर फिन अॅलनने वादळी खेळी साकारली. या सामन्यात त्याने 16 षटकार मारले. यापूर्वी, अफगाणिस्तानचा खेळाडू हजरतुल्ला झाझाईने 23 फेब्रुवारी 2019 रोजी आयर्लंडविरुद्धच्या टी 20 सामन्यात 16 षटकार ठोकले होते. पाकविरुद्ध या सामन्यात फिन ऍलनने या विक्रमाची बरोबरी केली. याशिवाय, अॅलनची ही न्यूझीलंडसाठी टी 20 मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी महिला क्रिकेटर सुझी बेट्सने नाबाद 124 धावा केल्या होत्या. ब्रेंडन मॅक्युलमने 123 धावांचे योगदान दिले होते. अॅलनने मात्र या सर्वांना मागे टाकण्याची कामगिरी केली.