वंदे भारत एक्स्प्रेसच्या विस्तारात वेळेच्या मर्यादेमुळे अडथळा

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अधिकाऱ्यांकडून बैठकांचे आयोजन  बेळगाव : बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार व्हावा, यासाठी रेल्वेच्या उच्चपदावरील अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका होत आहेत. परंतु, वेळेच्या मर्यादेमुळे या प्रस्तावावर अंतिम निर्णय झालेला नाही. विस्तारीकरणामुळे वंदे भारतचा वेळ वाढणार असून रात्री उशिरा वंदे भारत बेंगळूरला पोहोचल्यास प्रवाशांना उपयोग होणार नसल्याचे कारण रेल्वे अधिकाऱ्यांनी पुढे केले आहे. बेळगावमधून वंदे भारत सुरू व्हावी, अशी […]

वंदे भारत एक्स्प्रेसच्या विस्तारात वेळेच्या मर्यादेमुळे अडथळा

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अधिकाऱ्यांकडून बैठकांचे आयोजन 
बेळगाव : बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार व्हावा, यासाठी रेल्वेच्या उच्चपदावरील अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका होत आहेत. परंतु, वेळेच्या मर्यादेमुळे या प्रस्तावावर अंतिम निर्णय झालेला नाही. विस्तारीकरणामुळे वंदे भारतचा वेळ वाढणार असून रात्री उशिरा वंदे भारत बेंगळूरला पोहोचल्यास प्रवाशांना उपयोग होणार नसल्याचे कारण रेल्वे अधिकाऱ्यांनी पुढे केले आहे. बेळगावमधून वंदे भारत सुरू व्हावी, अशी जोरदार मागणी मागील वर्षभरापासून सुरू आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी बेळगावमध्ये वंदे भारत येईल, असे सांगितल्यानंतर नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. 21 नोव्हेंबर 2023 ला वंदे भारतची बेळगावपर्यंत चाचणीही झाली. परंतु, वर्ष होत आले तरी अद्याप वंदे भारत सुरू करण्यात आलेली नाही.
सध्या पहाटे 5.45 वाजता बेंगळूर येथून निघालेली वंदे भारत सकाळी 11.30 वाजता धारवाडला पोहोचते तर दुपारी 1.20 वाजता धारवाड येथून निघालेली एक्स्प्रेस सायंकाळी 7.30 वाजता बेंगळूरला पोहोचते. जर या एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार केल्यास दोन तासांनी वेळेत वाढ होणार आहे. दुपारी दीडच्या सुमारास एक्स्प्रेस बेळगावमध्ये पोहोचेल. त्यानंतर स्वच्छतेसाठी दीड तास लागणार आहे. दुपारी 3 वाजता बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस रात्री 10.30 वाजता बेंगळूरला पोहोचेल, असा अंदाज आहे. परंतु, 10.30 वाजता पोहोचल्यास प्रवाशांना तितकासा फायदा होणार नसल्याचे समोर येत आहे. लोकप्रतिनिधींकडून वंदे भारत सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव घातला जात आहे. त्यामुळे उच्चस्तरीय समितीकडून वारंवार बैठका सुरू आहेत. परंतु, रात्री 9 नंतर बेंगळूर रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नसल्याने अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. रात्री 9 नंतर लांब पल्ल्याच्या गाड्या येत असल्याने प्रवासाचा कालावधी कशा पद्धतीने कमी करावा, यासंदर्भात चर्चा केली जात आहे.