समर्थनगर मुख्य रस्त्याची वाताहात

समर्थनगर मुख्य रस्त्याची वाताहात

गुडघाभर चिखलातून वाट काढणे होतेय अवघड
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या समर्थनगर येथे मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली आहे. समर्थनगरमध्ये प्रवेश करतानाच गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागत आहे. रात्रीच्या वेळी चिखलाचा अंदाज न आल्याने दुचाकीचालक तसेच पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. अनेक अपघात होऊनदेखील प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. यामुळे समर्थनगर रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
समर्थनगर परिसरात 3 ते 4 हजार नागरिकांची लोकवस्ती आहे. दिवसेंदिवस या परिसरात नागरी वस्ती वाढत असून त्यामानाने सुविधा अपुऱ्या पडत आहेत. उपनगरांमध्ये एकाच रस्त्याचे विनाकारण दोन दोन वेळा डांबरीकरण केले जात असताना शहराच्या मध्यवर्ती भागात मात्र रस्ता करण्याकडे लोकप्रतिनिधींचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे.
समर्थनगर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक असतानाही मुख्य रस्ता करण्यात आलेला नाही. काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले. परंतु, काही वर्षातच मोठे खड्डे पडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखालून समर्थनगरमध्ये प्रवेश करतानाच मोठा खड्डा पडला आहे. गुडघाभर असलेल्या खड्ड्यातून वाहने हाकताना महिला वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे कायमस्वरुपी पक्का रस्ता करण्याची मागणी करण्यात येत आहे.