खड्डे चुकविण्याच्या नादात टिप्पर उलटल्याने चालक ठार

चोर्ला रस्त्यावरील बेटणेनजीक दुर्घटना वार्ताहर /कणकुंबी चोर्ला रस्त्यावरील जीवघेणे खड्डा चुकविण्याच्या नादात टिप्पर पलटी झाल्याने टिप्पर चालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान जांबोटी-कणकुंबी रस्त्यावरील बेटणे कासार नाल्याजवळ घडली. गजानन मष्णू चौगुले (वय 24) रा. गणेबैल असे जागीच ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. बेळगावहून गोव्याकडे वाळू घेऊन जाणारा टिप्पर क्रमांक जीए 04 […]

खड्डे चुकविण्याच्या नादात टिप्पर उलटल्याने चालक ठार

चोर्ला रस्त्यावरील बेटणेनजीक दुर्घटना
वार्ताहर /कणकुंबी
चोर्ला रस्त्यावरील जीवघेणे खड्डा चुकविण्याच्या नादात टिप्पर पलटी झाल्याने टिप्पर चालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान जांबोटी-कणकुंबी रस्त्यावरील बेटणे कासार नाल्याजवळ घडली. गजानन मष्णू चौगुले (वय 24) रा. गणेबैल असे जागीच ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. बेळगावहून गोव्याकडे वाळू घेऊन जाणारा टिप्पर क्रमांक जीए 04 टी 3583 हा बेटणे-कणकुंबी दरम्यान कासार नाला येथील एका लहानशा वळणावर आला असता समोरील खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गटारातील दगडधोंड्यावरून सरळ झाडाला आदळून पलटी झाला. त्यामध्ये चालक जागीच गतप्राण झाला. टिप्परचालक समोरच्या केबिनमध्ये अडकून पडल्याने घटनास्थळी केवळ त्याचे हात तेवढेच दिसत होते. टिप्परचा समोरील भाग चक्काचूर झाला. सदर अपघाताची माहिती कळताच जांबोटी ओपीचे एएसआय एन. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जेसीबीच्या साहाय्याने टिप्पर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आला.  संध्याकाळी मृतदेह शवचिकित्सेसाठी खानापूरला पाठविण्यात आला. गजानन मष्णू चौगुले याने दीड-दोन वर्षापूर्वी टिप्पर खरेदी केला होता. तो दररोज बेळगाव-गोवा अशी वाळू वाहतूक करत होता. यावर्षी त्याचा विवाह निश्चित करण्यासाठी आई-वडील प्रयत्न करत होते. परंतु विवाहापूर्वीच चोर्ला रस्त्यावरील ख•dयांनी त्याचा जीव घेतला. त्याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
चोर्ला रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या महिनाभरात या रस्त्यावर चार मोठे अपघात झाले असून गेल्या तीन-चार वर्षांपासून चोर्ला रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाला अजून किती बळी हवेत? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. गेल्या पावसाळ्यामध्ये रास्तारोको आंदोलनाचे शस्त्र उगारल्याने दगड-माती घालून तात्पुरते खड्डे बुजविले होते. खड्डा चुकविण्याच्या नादात दिवसागणिक अनेक अपघात होत असून प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. रस्त्याच्या डांबरीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली असून कंत्राटदाराने कामाला त्वरित सुरुवात करावी, अशी मागणी केली जात आहे.