संसदेत राहुल गांधींसारखे वागू नका !

संसदेत राहुल गांधींसारखे वागू नका !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रालोआ सदस्यांना सूचना, नियम-प्रथांचा अभ्यास करण्याचे आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रात सलग तिसऱ्यांना सत्तेवर आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नव्या लोकप्रतिनिधींनी संसदेच्या नियमांचा आणि प्रथांचा सखोल अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे वर्तन करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी प्रतिपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासारखे मुळीच वागू नये, अशी खोचक टिप्पणीही यावेळी केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांसदीय मंडळाच्या बैठकीत ते मंगळवारी भाषण करीत होते. या बैठकीला या आघाडीचे सर्व लोकसभा आणि राज्यसभा सदस्य उपस्थित होते.
गांधी यांनी सोमवारी लोकसभेत त्यांच्या भाषणात अनेक असत्य विधाने केली, असा आरोप सत्ताधारी आघाडीचे सदस्य करीत आहेत. तसेच भाषण करताना चुकीची माहिती देणे, लोकसभा अध्यक्षांकडे पाठ फिरवून बोलणे, स्वत:चे भाषण सुरु असतानाच अन्य खासदाराशी हस्तांदोलन करणे, हिंदू समाजाच्या संबंधात अश्लाघ्य टिप्पणी करुन नंतर सारवासारवी करण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक चुका त्यांनी केल्या, ज्या त्यांच्या पदाला शोभणाऱ्या नव्हत्या. गांधी प्रतीपक्ष नेता असून त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. त्यांनी या पदाला शोभेल अशी वर्तणूक केली पाहिजे, अशीही टिप्पणी सत्ताधारी आघाडीने त्यांच्या भाषणावर केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सूचना केल्या.
देशसेवा हे प्राधान्य
सांसदीय मंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी पत्रकार परिषदेत बैठकीमध्ये घडलेल्या घडामोडींची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना अनेक सूचना केल्या. ज्या जनतेने आपल्याला जनप्रतिनिधी होण्याचा मान दिला, त्या जनतेची सेवा आणि देशाची सेवा ही आपली प्राथमिकता असावयास हवी. आपण संसदेच्या कार्यप्रणालीचा. नियमावलीचा आणि प्रथांचा सविस्तर अभ्यास करावयास हवा. आपली संसदेतील आणि संसदेबाहेरील वर्तणूक आपल्या पदाला शोभेल अशी असली पाहिजे. आपल्या हातून संसदीय नियमांचा भंग होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
नेहमीच त्यांचा आदर केला…
आपण जणू सत्ता भोगण्यासाठीच आहोत, अशी काँग्रेसची समजूत आहे. या पक्षाने अनेक दशके सत्तेवर ठाण मांडले होते. पण सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या एका कार्यकर्त्याने सलग तीनदा लोकसभा निवडणूक जिंकून देशाचा सर्वोच्च नेता होण्याचा मान मिळविला, ही बाब या पक्षाला सहन होत नाही. त्यामुळे या पक्षाचे नेते सैरभैर झाले आहेत. ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर, भारतीय जनता पक्षावर आणि माझ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत असत्य टीका करतात. तथापि, मी नेहमीच त्यांचा आदर केला आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी संसदेच्या संग्रहालयाला भेट द्यावी. तेथे भारतासाठी योगदान दिलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांची छायाचित्रे तुम्हाला दिसतील. सर्वांचा आदर राखण्याची आमची संस्कृती आहे, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात केले, अशी माहिती रिजीजू यांनी दिली.