जोकोविच, गॉफिन विजयी, सित्सिपस तिसऱ्या फेरीत

फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस : कार्लोस अल्कारेझ, ऑन्स जेबॉर, सोफिया केनिन, पॉला बेडोसा यांचीही तिसऱ्या फेरीत धडक वृत्तसंस्था /पॅरिस सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पहिला सामना जिंकला असला तरी त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन झाले नाही. त्याने पीयरे ह्युगुसवर विजय मिळवित दुसरी फेरी गाठली तर ग्रीसच्या सित्सिपसने तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. याशिवाय प्रेक्षकांच्या विरोधाचा […]

जोकोविच, गॉफिन विजयी, सित्सिपस तिसऱ्या फेरीत

फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस : कार्लोस अल्कारेझ, ऑन्स जेबॉर, सोफिया केनिन, पॉला बेडोसा यांचीही तिसऱ्या फेरीत धडक
वृत्तसंस्था /पॅरिस
सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पहिला सामना जिंकला असला तरी त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन झाले नाही. त्याने पीयरे ह्युगुसवर विजय मिळवित दुसरी फेरी गाठली तर ग्रीसच्या सित्सिपसने तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. याशिवाय प्रेक्षकांच्या विरोधाचा मुकाबला करीत बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनने वाईल्डकार्ड प्रवेशधारक जिओव्हानी एम्पेत्शी पेरिकार्डवर पाच सेट्सच्या संघर्षानंतर मात केली. स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, महिलांमध्ये ऑन्स जेबॉर, पॉला बेडोसा, सोफिया केनिन यांनी विजय मिळवित तिसरी फेरीत स्थान मिळविले. बुधवारी पावसाच्या व्यत्ययामुळे अनेक सामने थांबवण्यात आले होते.
येथील स्पर्धा तीन वेळा जिंकणाऱ्या जोकोविचने फ्रान्सच्या ह्युगुसवर 6-4, 7-6 (7-3), 6-4 असा विजय मिळविला. त्याला जागतिक अग्रमानांकन राखण्यासाठी येथील स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची गरज आहे. मात्र याआधी झालेल्या एकाही स्पर्धेत त्याच्याकडून तसे प्रयत्न झाले नाही. तीन स्पर्धांत तो उपांत्य फेरीत पराभूत झाला. त्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जिनिव्हा ओपन स्पर्धेतील पराभवाचाही समावेश आहे. ह्युगुसवर विजय मिळविण्यासाठी त्याला अडीच तास संघर्ष करावा लागला. या मोसमातील त्याचे रेकॉर्ड 15-6 असे झाले आहे. त्याची दुसऱ्या फेरीत स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बाएनाशी होईल. पहिल्या फेरीच्या दिवशी पावसामुळे अनेक सामने उशिरा सुरू करावे लागले होते. फक्त दोन प्रमुख कोर्टवर सरकत्या छताची सोय करण्यात आलेली आहे.
सित्सिपसचा विजयासाठी संघर्ष
ग्रीसचा माजी उपविजेता स्टेफानोस सित्सिपसने जर्मनीच्या डॅनियल अल्टमायरचा 6-3, 6-2, 6-7 (2-7), 6-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. नवव्या मानांकित सित्सिपसने गेल्या महिन्यात माँटे कार्लो स्पर्धा जिंकली होती आणि बार्सिलोनातील स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. येथील स्पर्धेत त्याला जेतेपदाच्या दावेदारांपैकी एक मानले जात आहे. त्याने अल्टमायरवर पूर्ण वर्चस्व राखत पहिले दोन सेट जिंकताना ताकदवान फोरहँड फटक्यांचा सढळ वापर केला. पण तिसऱ्या सेटमध्ये अल्टमायरने शानदार प्रदर्शन करीत सेट जिंकून सामना चौथ्या सेटवर नेला. पण सित्सिपसने शेवटचा सेट जिंकून तिसऱ्या फेरीतील स्थान निश्चित केले. त्याची पुढील लढत लॉरेन्झो सोनेगो किंवा चीनचा झँग झिझेन यापैकी एकाशी होईल.
गॉफिनला प्रेक्षकांचा विरोध
बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनला स्थानिक पेरिकार्डविरुद्धच्या सामन्यात प्रेक्षकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. त्याने जिओव्हानी पेरिकार्डवर साडेतीन तासाच्या लढतीत 4-6, 6-4, 6-3, 6-7 (4-7), 6-3 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. स्थानिक खेळाडूला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत होता तर गॉफिनला तीव्र विरोध होत होता. त्याला न जुमानता संयमाने खेळ करीत संघर्षपूर्ण विजय साकारला. एका प्रेक्षकाने त्याच्याकडे पाहून थुंकल्याचा आरोपही त्याने केला आणि त्यांच्या एकंदर पक्षपाती वर्तनाबद्दल व आपला अनादर केल्याबद्दल त्याने आयोजकाकडे तक्रारही केली. अन्य एका सामन्यात स्पेनच्या तिसऱ्या मानांकित कार्लोस अल्कारेजने जे. डी जाँगचा 6-3, 6-4, 2-6, 6-2 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. महिला विभागात ट्युनिशियाच्या ऑन्स जेबॉरने ओसोरिओ सेरॅनोचा 6-3, 1-6, 6-3 असा तर 26 व्या मानांकित केटी बोल्टरला पॉला बेडासाने 4-6, 7-5, 6-4 असे हरवून तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. सोफिया केनिननेही तिसरी फेरी गाठताना कॅरोलिना गार्सियाचा 6-3, 6-3 असा पराभव केला.