धवल कुलकर्णी मुंबईचा नवा गोलंदाज मेंटर

धवल कुलकर्णी मुंबईचा नवा गोलंदाज मेंटर

वृत्तसंस्था /मुंबई
2024-25 च्या क्रिकेट हंगामात होणाऱ्या विविध राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांकरिता मुंबई रणजी संघाच्या गोलंदाज मेंटरपदी माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट संघटेनच्या बैठकीमध्ये हा वरिल निर्णय घेण्यात आला. 2014 ते 2016 या कालावधीत धवल कुलकर्णीने 12 वनडे आणि 2 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. यानंतर तो क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्याने प्रशिक्षक क्षेत्रात आपला प्रवेश केला. मुंबई संघाने गेल्या वर्षी विक्रमी 42 व्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरले. या संघाला धवल कुलकर्णीचे बहुमोल मार्गदर्शन लाभले होते. धवल कुलकर्णीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 96 प्रथम श्रेणी सामन्यात 285 गडी बाद केले असून त्याने 130 लिस्ट ए सामन्यात 223 बळी तसेच 162 टी-20 सामन्यात 154 गडी बाद केले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर 10 जुलै रोजी 75 व्या वर्षात पदार्पण करत असून त्याचा मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे या प्रसंगी खास सत्कार करण्यात येत असल्याचे मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक यांनी सांगितले.