दुष्काळ असूनही नाही वापरला टँकर!

दुष्काळ असूनही नाही वापरला टँकर!

नगर योजना विभागाचे जिल्ह्यातील 37 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीत यशस्वी पाणीपुरवठा नियोजन : उपलब्ध स्त्रातांचे केले पुनरुज्जीवन 
बेळगाव : राज्यासह जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती असताना अनेक ठिकाणी पाणी समस्या निर्माण होऊन टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या नगर योजना विभागाकडून पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केल्याने जिल्ह्यातील 37 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीत एकही टँकर पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आला नाही. तर उपलब्ध स्त्राsतांच्या आधारावर पाणीपुरवठा करण्यात नगर योजना विभागाला यश आले आहे. जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक तालुक्यांत पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण होऊन जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 100 पेक्षा अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीमध्ये पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून दुष्काळ परिस्थितीमध्येही यशस्वी पाणीपुरवठा करून दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणाऱ्या नगर योजना विभागाच्या व्याप्तीमध्ये 37 स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे. यामध्ये नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींचा समावेश आहे. सदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीमध्ये पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगर योजना विभागावर आहे. त्यानुसार दुष्काळ परिस्थितीची दखल घेऊन नगर योजना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीतील कूपनलिका, जुन्या विहिरींमधील गाळ काढून पुनरुज्जीवन केले. उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती जाणून घेऊन योग्यप्रकारे पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीत पाण्याची समस्या निर्माण झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
3 हजार 981 कूपनलिका
37 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीत 3 हजार 981 कूपनलिका असून या कूपनलिकांना असणाऱ्या पाण्याच्या आधारावरच नियोजन करण्यात आले होते. तसेच विहिरींमधील गाळ काढून आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला आहे. 829 वॉर्डांमध्ये विभागानुसार 2, 3, 4, 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे. तर गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास 90 टँकरांचीही व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी निधीही राखून ठेवण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे दुष्काळ परिस्थिती असूनही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
एकही तक्रार नाही…
जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्याने अनेक गावांतून ग्राम पंचायतींवर मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला पाणीपुरवठ्यासाठी निवेदने देण्यात आली होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीमध्ये पाणी समस्यासंदर्भात एकही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.