फायनान्स कंपनीतील चोरीत कर्मचाऱ्याचाच हात

फायनान्स कंपनीतील चोरीत कर्मचाऱ्याचाच हात

अन्य साथीदारांसह लुटले होते 22 लाख, कर्जमुक्ती आणि चैनीसाठी घातला दरोडा
बेळगाव : संगमेश्वरनगर येथील श्री कॉमर्स मार्केट सर्व्हिस प्रा. लि. मधील चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले आहे. त्या कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणानेच वेगवेगळ्या गावातील सहकाऱ्यांना गोळा करून बनावट चाव्यांचा वापर करून लॉकरमधील तब्बल 21 लाख 98 हजार 682 रुपये पळविले होते. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी गुरुवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 6 मे 2024 रोजी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता. श्री कॉमर्स मार्केट सर्व्हिस प्रा. लि. चे शटर उचकटून चोरट्यांनी इमारतीत प्रवेश केला होता. बनावट चाव्यांचा वापर करून लॉकरमधील रक्कम व दहावीच्या गुणपत्रिका पळविल्या होत्या.
या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मलिकजान इमामहुसेन हवालदार (वय 28) रा. यमनापूर, मेहबूब सुभानी ऊर्फ तोहिद सलाउद्दीन शिंगरगाव (वय 30) उस्मान सलाउद्दीन शिंगरगाव (वय 26) दोघेही रा. नंदगड, ता. खानापूर, शोएब अख्तर हुसेनसाब तानेखान (वय 24) रा. एम. के. हुबळी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 64.38 ग्रॅम सोने, 1 लाख 38 हजार रुपये रोकड, गुन्ह्यासाठी वापरलेली मारुती सुझुकी कार, तीन मोटरसायकली, मोबाईल, मार्बल कटर मशीन असा एकूण 7 लाख 56 हजार 390 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेनंतर बहुतेक रक्कम या चौकडीने कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि चैनीसाठी वापरल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन, उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक किरण होनकट्टी, एस. व्ही. बडीगेर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बसवराज मिटगार, अजित शिप्पुरे, भरमा करेगार, डी. सी. सागर, जी. एम. नरगुंद, बसवराज बाणसे, केंपण्णा दोडमनी, गोविंदप्पा पुजार, नामदेव लमाणी, धऱ्याप्पा फेन्नण्णावर, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींनी या कारवाईत भाग घेतला.
‘हवालदार’च बनला दरोडेखोर
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलिकजान हवालदार हा श्री कॉमर्समध्ये काम करीत होता. कंपनीचे व्यवहार व पैसे ठेवण्याचे ठिकाण आदींविषयी त्याला माहिती होती. वेगवेगळ्या गावातील सहकाऱ्यांना गोळा करून त्याने बनावट चावीच्या साहाय्याने हे कृत्य केले आहे.