‘डेड लाईन’ ठेपली, स्मार्ट कामे रखडली

‘डेड लाईन’ ठेपली, स्मार्ट कामे रखडली

अनेक ठिकाणी बांधकामे चालूच : रोजची वाहतूक कोंडीही कायम
पणजी : राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीची विविध कामे संपवण्याची मुदत ऐन तोंडावर पोहोचली असून शिल्लक राहिलेली कामे पाहिली तर 31 मे पर्यंत सर्व कामे संपणे कठीण असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. शिवाय अर्धवट असलेली कामे संपवण्यास किती दिवस लागतील याचाही अंदाज बांधणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 31 मे ची मुदत ही फक्त वाहनचालक आणि जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यासठीच देण्यात आली होती हे आता उघड झाले आहे. मुदत संपली तरी स्मार्ट सिटीचे घोंगडे पावसात भिजत राहणार, अशी चिन्हे दिसत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी खोदण्यात आलेले चर, ख•s अनेक दिवस तसेच आहेत. काही रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून त्यांचे डांबरीकरण करण्यात स्मार्ट सिटी इमेजिन पणजी डेव्हलपमेंट या कंपनीस यश आले असले तरी सर्व कामे मुदतीत संपवण्यास कंपनीला अपयश आल्याचे दिसून येत आहे. मुदत संपण्यास केवळ दोनच दिवस बाकी असून त्या कालावधीत हातात घेण्यात आलेली कामे पूर्ण होणे शक्य नाही.
रस्त्यांमुळे वाहनचालकांची कुचंबणा
मुदत संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना काकुलो जंक्शनकडे नव्याने रस्त्dयाच्या कामास सुरुवात करण्यात आली असून तो रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. स्मार्ट सिटी कंपनीने त्याची कसलीच पूर्वसूचना दिलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांची मोठी अडचण झाली असून मधुबन सर्कल बालभवन ते काकुलो जंक्शनकडे वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
रस्ता बंद असल्याचा सूचना फलक नाही
विवांता जंक्शन ते शितल हॉटेल, तेथून पुढे काकुलो मॉल तसेच मधुबन जंक्शनकडील रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. पण नंतर काकुलो जंक्शन पुन्हा वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहनचालक संतापल्याचे दिसून आले. पुढे रस्ता बंद आहे याची पूर्वसूचना अगोदर देण्यात आली नसल्याने अनेक वाहनचालकांना काकुलो जंक्शनकडे जाऊन पुन्हा माघारी परतावे लागले.
आल्तिनो ते भाटले रस्ता बंद
आल्तिनो ते भाटले हा रस्ताही खणून ठेवण्यात आल्याने वाहनचालकांची अडचण वाढली असून ते काम पूर्ण होण्यास आठवडा तरी लागण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून स्मार्ट सिटीचे काम या पावसात उघडे पडणार आहे.