डेव्हिस कप : पाकमध्ये जाण्यास परवानगी मिळण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली-कराची भारतीय टेनिस संघाला पाकिस्तानविरुद्धच्या आगामी डेव्हिस कप लढतीसाठी त्या शेजारील राष्ट्रात जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय संघटनेने शनिवारी सांगितले आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) अलीकडेच क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून 3 व 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जागतिक गट-1 मधील प्ले-ऑफ लढतीसाठी राष्ट्रीय संघ पाकिस्तानला पाठवित्ण्याबाबत सल्ला मागितला आहे. आम्हाला अद्याप […]

डेव्हिस कप : पाकमध्ये जाण्यास परवानगी मिळण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली-कराची
भारतीय टेनिस संघाला पाकिस्तानविरुद्धच्या आगामी डेव्हिस कप लढतीसाठी त्या शेजारील राष्ट्रात जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय संघटनेने शनिवारी सांगितले आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) अलीकडेच क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून 3 व 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जागतिक गट-1 मधील प्ले-ऑफ लढतीसाठी राष्ट्रीय संघ पाकिस्तानला पाठवित्ण्याबाबत सल्ला मागितला आहे.
आम्हाला अद्याप लेखी मान्यता मिळालेली नाही पण लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की, ही द्विपक्षीय स्पर्धा नाही आणि ‘आयटीएफ’ने आयोजित केलेली स्पर्धा आहे. अशा कार्यक्रमांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारचे धोरण नाही, असे ‘एआयटीए’चे सरचिटणीस अनिल धुपर यांनी सांगितले. यासाठी प्रक्रिया ठरलेली आहे. क्रीडा मंत्रालयाने ही विनंती परराष्ट्र मंत्रलयाकडे पाठवली आहे आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी गृह मंत्रालयाचे मत देखील घेतले जाईल. आम्हाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा आहे. आम्ही लढतीची आणि प्रवासाची तयारी करत आहोत, असे त्यानीं पुढे सांगितले.
दरम्यान, पाकिस्तान टेनिस महासंघाने (पीटीएफ) शनिवारी सांगितले की, इस्लामाबादमधील डेव्हिस कप लढतीमधील भारतातील खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या सहभागासंदर्भात अंतिम पुष्टीची त्यांच्याकडून प्रतीक्षा करण्यात येत आहे. ‘एआयटीएने आम्हाला इस्लामाबादला येणार असलेल्या 11 अधिकारी आणि 7 खेळाडूंची यादी व्हिसा प्रक्रियेसाठी पाठविली आहे. परंतु त्यांच्या आगमनासंदर्भातील अंतिम पुष्टीची आम्ही अद्याप वाट पाहत आहोत,” असे पीटीएफचे अध्यक्ष सलीम सैफुल्ला यांनी सागितले.
‘त्यांनी (एआयटीए) म्हटले आहे की, पाकिस्तानला जाण्यासाठी त्यांच्या सरकारकडून मंजुरी मिळाल्यावर ते अंतिम पुष्टी पाठवतील. या यादीत त्यांचा कर्णधार रोहित राजपाल आणि इतर सात खेळाडूंचा समावेश आहे, याकडे सैफुल्ला यांनी लक्ष वेधले. भारतीय डेव्हिस चषक संघ यापूर्वी शेवटचा 1964 मध्ये पाकिस्तानला गेला होता. त्यावेळी अख्तर अली, प्रेमजित लाल आणि एस. पी. मिश्रा यांनी भारताला लाहोरमध्ये 4-0 असा विजय मिळवून दिला होता. 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाकमध्ये होणार होती. परंतु त्या प्रसंगी एआयटीएने दोन्ही देशांमधील राजकीय कलहाचा हवाला देत कझाकस्तान या तटस्थ ठिकाणी सदर लढत स्थलांतरित करण्यात यश मिळविले होते.