श्री ताडमाड देवस्थान, वटवृक्षावर संकट
स्मार्ट सिटीची संरक्षक भिंत कोसळली : बाजूच्या इमारतींनाही संभवतो धोका,गचाळ, भ्रष्टाचारी बांधकामांचा पर्दाफाश,विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र
पणजी : सांतइनेज येथील श्री ताडमाड देवस्थानजवळ स्मार्ट सिटी अंतर्गत गटारासाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. मंदिराला धोका पोहोचला असून स्मार्ट सिटीच्या गचाळ आणि भ्रष्टाचाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. गटार खचल्याने मंदिर व वडाच्या झाडालाही धोका निर्माण झाला आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास गटाराच्या कडा कोसळून बाजूला असलेल्या इमारतींनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटीच्या या कारभाराविरोधात विरोधक एकवटले असून त्यांनी सरकारवर टीकास्त्र चालविले आहे. शनिवार, रविवारी राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडला आहे. पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी या प्रकाराची पाहणी कऊन मंदिराला कुठलाच धोका न पोहोचता 10 दिवसांच्या आत कोसळलेल्या भिंतीचे काम पुन्हा करण्याचा आदेश कंत्राटदाराला दिला आहे.
बेजबाबदारपणाचा कळस
वास्तविक ही सर्व कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला होता, मात्र ती कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे स्मार्ट सिटीची कामे 7 जूनपर्यंत संपविण्याचा आदेश देण्यात आला आहे. घाईगडबडीत तसेच बेजबाबदारपणाने काम केल्याने ही संरक्षक भिंत कोसळली आहे. हा निव्वळ कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणीही केली जात आहे. परिसरातील लोक तसेच पणजीतील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
मंदिरासह वटवृक्षाला धोका
श्री ताडमाड देवस्थान प्रसिद्ध आहे. त्याच्या ठिकाणीच वटवृक्षही आहे. आता या खचलेल्या भिंतीमुळे वटवृक्ष तसेच मंदिरालाही धोका निर्माण झाला आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही भिंत कोसळली आहे, असा आरोप केला जात आहे. या हलगर्जीपणाच्या कामाचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. या विषयी गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्षाने निषेध केला असून कंत्राटदारावर गुन्हा नोंद करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. समाजकार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांनीही घटनास्थळी जाऊन पहाणी केली आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
कंत्राटदारावर गुन्हा नोंद करा
गोवा फॉरवर्डचे प्रमुख तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी या कोसळलेल्या भिंतीची दखल घेत मुख्य सचिवांना पत्र लिहून स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. कंत्राटदाराच्या या बेजबाबदार कामामुळे श्री ताडमाड देवस्थानाला धोका निर्माण झाला आहे. या कंत्राटदाराने कमी दर्जाची तसेच चुकीच्या पद्धतीने कामे केल्याने असे प्रकार घडत आहेत. या अगोदर स्मार्ट सिटीच्या कामाचा पणजीकरांना तसेच पणजीत येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. या सर्व कामांचे ऑडिट कऊन सखोल चौकशी करण्याची मागणी सरदेसाई यांनी केली आहे.
योग्य कंत्राटदाराची नियुक्ती हवी
स्मार्ट सिटीच्या कारभाराबाबत आपण अगोदरपासूनच बोलत आहे. आत्ता पावसाला सुऊवात झाली असून हे प्रकार असेच सुरू राहिले तर पुढे काय होईल, असा प्रश्न उत्पल पर्रीकर यांनी उपस्थित केला आहे. मुळात चुकीच्या कंत्राटदाराची नियुक्ती केल्याने हे प्रकार घडत आहे. या भागातील माती वाळूसारखी आहे. पाणी भरून राहिल्यास ती माती सरकत जाईल आणि आजूबाजूला असलेल्या इमारतींना धोका निर्माण होईल. कोणताही अनर्थ घडण्या अगोदर त्वरित कोसळलेली भिंत उभारणे गरजेचे आहे, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भारतभरात चांगली कामे झाली आहेत. मात्र पणजी स्मार्ट सिटीच्या कामासाठी योग्य अभियंते आणि योग्य कंत्राटदार नसल्याने असे प्रकार घडत आहेत, असेही उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कंत्राटदाराला घालतात पाठीशी
स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आपचे प्रदेशाध्यक्ष अॅड अमित पालेकर यांनी केली आहे. स्मार्ट सिटीच्या कामात हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास व नुकसान होत आहे तरी मुख्यमंत्री या कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत, असेही ते म्हणाले.
घटनास्थळावर सुरक्षा उपाययोजना सुरू
गेल्या दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत खचण्याचा प्रकार घडला आहे. 6.5 मीटर खोलवर सांडपाण्यासाठी मुख्य पाईपलाईन घालण्यात आली होती. भरतीच्या पाण्याची पातळी वाढू लागल्याने नाल्याच्या खालील असलेली वाळूमय माती सरकली आणि गटरासाठी उभारण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळली. आमची टीम दुऊस्तीसाठी सक्रियपणे काम करत आहे. घटनास्थळावरील आणखी नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आम्ही लोकांना आश्वासन देतो की सार्वजनिक वापरासाठी बंद असले तरी घटनास्थळावर सर्व सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे आयपीएससीडीसीच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.
स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारावर गुन्हा नोंद करावा. सर्व बांधकामांचे ऑडिट करावे. सखोल चौकशी करुन दोषींना शिक्षा करावी.
– आमदार विजय सरदेसाई
मुळात चुकीच्या कंत्राटदाराची नियुक्ती केल्याने हे प्रकार घडत आहेत. माती सरकत जाईल आणि इमारतींना धोका निर्माण होईल.
– उत्पल मनोहर पर्रीकर
स्मार्ट सिटीच्या कामात हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होत आहेत, तरीही मुख्यमंत्री कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत.
अॅड. अमित पालेकर, आप
Home महत्वाची बातमी श्री ताडमाड देवस्थान, वटवृक्षावर संकट
श्री ताडमाड देवस्थान, वटवृक्षावर संकट
स्मार्ट सिटीची संरक्षक भिंत कोसळली : बाजूच्या इमारतींनाही संभवतो धोका,गचाळ, भ्रष्टाचारी बांधकामांचा पर्दाफाश,विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र पणजी : सांतइनेज येथील श्री ताडमाड देवस्थानजवळ स्मार्ट सिटी अंतर्गत गटारासाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. मंदिराला धोका पोहोचला असून स्मार्ट सिटीच्या गचाळ आणि भ्रष्टाचाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. गटार खचल्याने मंदिर व वडाच्या […]