बहरीनला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात गोंधळ; केबिन क्रूसोबत असभ्य वर्तन
कोझिकोडहून बहरीनला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात केबिन क्रूसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली. केबिन क्रूसोबत गैरवर्तन करून आरोपी विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. अब्दुल मुसावीर नाडुकंडी असे आरोपीचे नाव आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपी नाडुकंडी हा केरळचा रहिवासी आहे. कोझिकोडहून टेक ऑफ केल्यानंतर तो आपल्या सीटवरून उठला आणि परत गेला आणि केबिन क्रूला मारहाण करून विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने इतर प्रवाशांसोबत गैरवर्तन केले आणि आपत्कालीन दरवाजा उघडण्याची धमकी दिली.
सुरक्षा धोक्याच्या भीतीने वैमानिकाने मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 336, 504, 506 आणि 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By – Priya Dixit